सातारा : गावोगावी वनराई बंधारे उभारण्यात येत असून, त्यामध्ये गावाकर्‍यांसह सामाजिक संस्थाही सहभागी होत आहेत. (Pudhari File Photo)
सातारा

Water Conservation Structures | जिल्ह्यात साकारले अडीच हजार बंधारे

गावोगावी घुमला जलक्रांतीचा नारा : भूजल पातळी वाढण्यास मदत

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण शिंगटे

सातारा : उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून सातारा जिल्हा परिषदेने सार्वजनिक जलस्त्रोत बळकटीकरणासाठी गावोगावी वनराई बंधार्‍याचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात नदी, नाले, ओढ्यावर रविवारपर्यंत 2 हजार 317 वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. दररोज हा आकडा वाढत आहे. त्यामुळे बंधार्‍यांची संख्या सुमारे अडीच हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. गावपातळीवर लोकसहभागातून बंधारे बांधून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे. त्यामुळेच गावोगावी जलक्रांतीची ललकारी घुमली आहे.

वनराई बंधार्‍याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत गावोगावी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍यांना दिल्या होत्या. पावसाळा संपल्याने आता ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदीमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. यासाठी प्लास्टिक पिशव्या, सिमेंटची पोती, दगड, माती आदीचा वापर करण्यात येत आहे. त्यानुसार गावोगावी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वनराई बंधार्‍यांची कामे सुरु आहेत. तर काही ठिकाणी हे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे गावची शेतशिवारे वनराई बंधारेमय झाली असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. वनराई बंधार्‍यासाठी गावचे नागरिक, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक मंडळे, विद्यार्थी, खासगी कंपन्याचेही सहकार्य मिळत आहे. गावोगावी बांधल्या जाणार्‍या या वनराई बंधार्‍यामुळे पाणी टंचाईवर मात करणे काही अंशी शक्य होणार आहे.

वनराई बंधार्‍यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरता, जनावरांना पाणी पिण्याकरता, वनराई बंधार्‍याच्या आजूबाजूला असलेल्या विहीरीच्या भूजल पातळीत वाढ होण्याकरता मदत होणार आहे. वनराई बंधार्‍याच्या जलसाठ्यातून पाण्याचा उपसा करुन रब्बी व उन्हाळी हंगामात भाजीपाला, कडधान्ये, रब्बी तृणधान्ये, गळीत धान्ये यासारखी पिके घेण्यासाठी होणार आहे. या बंधार्‍यामुळे जास्तीचा जलसाठा होवून सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.

गावोगावी वनराई बंधारे श्रमदानातून व लोकसहभागातून बांधले जात आहेत. वनराई बंधारे भू आणि जलसंधारणासाठी एक महत्त्वाचे साधन आहेत आणि पाणलोट क्षेत्र विकासाला मदत करत आहेत. या वनराई बंधार्‍यामुळे गावोगावी जलक्रांती निर्माण होण्यास मदत होत आहे.
याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा

पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण...

जिल्ह्यात पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी नदी, नाले, ओढ्यावर वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. सातारा 237, कोरेगाव 214, खटाव 214, माण 250, फलटण 116, खंडाळा 108, वाई 164, महाबळेश्वर 126, जावली 177, कराड 287, पाटण 424 असे मिळून 2 हजार 317 हून वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे गावोगावी विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT