सांगली

सांगली : क्रीडासंकुलाचे मारुती माने नामकरण अंतिम टप्प्यात

Shambhuraj Pachindre

सांगली : पुढारी वृत्तसेवा

कुस्तीचा स्वाभिमान आणि जिल्ह्याचे सुपुत्र हिंदकेसरी पै. मारुती माने (भाऊ) यांचे नाव जिल्हा क्रीडा संकुलास देण्यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे यासाठीचे पत्र देखील आले आहे. सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराम मोहिते यांनी ही माहिती पत्रकार बैठकीत दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पै. भीमराव माने उपस्थित होते.

मोहिते म्हणाले, हिंदकेसरी भाऊंनी अल्पावधीत राज्याचे नव्हे तर देशाचे नाव कुस्तीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचविले. देशाला पदके मिळवून दिली. जिल्ह्याचे नाव जगाच्या पातळीवर नेणारे ते एकमेव पैलवान ठरले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी माने यांना राज्यसभेत काम करण्याची संधी दिली होती. तसेच नवी दिल्लीतील एका मार्गाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र जन्मभूमी सांगलीमध्ये एकाही चौकाला अथवा रस्त्याला त्यांचे नाव नाही ही शोकांतिका आहे.

ते म्हणाले, क्रीडा संकुलास हिंदकेसरी भाऊंचे नाव देण्यासाठी खासदार धैर्यशील माने आणि आम्ही काही महिन्यांपासून प्रयत्न करीत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 2020 मध्ये या मागणीचे निवेदन दिले आहे. नंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे याबाबत अभिप्राय मागविण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार, आमदार यांना भेटणार आहे.

पै. मोहिते म्हणाले, स्व. भाऊ यांचे कुस्ती, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातही योगदान आहे. त्यांचे कार्य जिल्ह्याचा स्वाभिमान म्हणून तरुण पिढीसमोर आदर्श म्हणून राहण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हा क्रीडा संकुलास त्यांचेच नाव द्यावे, हेच उचित ठरणार आहे. यावेळी कवठेपिरानचे उपसरपंच सागर पाटील, हिंदकेसरी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद तामगावे, रघुनाथ दिंडे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

क्रीडासंकुलास हिंदकेसरी भाऊंचे नाव देण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. आदरणीय पै. संभाजी पवार असते तर त्यांनीच स्व. भाऊंचे नाव देण्यासाठी पुढाकार घेतला असता.
– पै. भीमराव माने, माजी जि. प. सदस्य

SCROLL FOR NEXT