सांगली : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिकेच्या अतिथीगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल आणि प्रसूतिगृहाची इमारत बांधण्यासाठी निविदा मागविण्यास स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. या पाच मजली इमारतीमध्ये 40 दुकानगाळे, अद्ययावत प्रसूतिगृह असणार आहे. 19.47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गाळ्यांच्या लिलावामधून हा निधी उभा केला जाणार आहे. नालेसफाईसाठी 99.42 लाख, पॅचवर्कसाठी 2 कोटींच्या निविदेसही मंजुरी देण्यात आल्याचे सभापती निरंजन आवटी यांनी सांगितले. महापालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी झाली. सभापती आवटी अध्यक्षस्थानी होते. सदस्य संतोष पाटील, फिरोज पठाण, जगन्नाथ ठोकळे, गजानन आलदर, मनगु सरगर, सुनंदा राऊत, सविता मदने, कल्पना कोळेकर व सदस्य उपस्थित होते.
व्यापारी संकुल व प्रसूतिगृह बांधण्यासाठी 19.47 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तळमजल्यावर पार्किंग, ग्राउंड फ्लोअरवर 22 व पहिल्या मजल्यावर 18 असे 40 दुकान गाळे असणार आहेत. दुसर्या मजल्यावर प्रसूतिगृह आहे. शस्त्रक्रिया, डिलिव्हरी विभाग, अतिदक्षता विभाग, एक्स-रे रूम, औषध दुकान, सल्लाकेंद्र असेल. तिसर्या मजल्यावर जनरल वॉर्ड, स्टाफ रूम, स्पेशल रूम तसेच रुग्ण व नातेवाईकांसाठी प्रतीक्षागृह तर चौथ्या मजल्यावर दोन भोजनालये
असतील.