देशातील शेतकर्यांवर लादलेले तीनही अन्यायकारक कृषी कायदे केंद्र सरकारला अखेर मागे घ्यावे लागले आहेत. देशभरातील शेतकर्यांसह काँग्रेस पक्षाने उभारलेल्या या ऐतिहासिक लढ्याचा हा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केली.
ना. कदम म्हणाले, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पहिल्या दिवसापासून या काळ्या कायद्यांचा विरोध केला होता. खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी कृषी आंदोलनात आघाडीवर होते.केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र प्रतिकार केला होता.
ते म्हणाले, जुलमी कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात तीव्र आंदोलने केली. सांगली जिल्ह्यामध्ये देखील ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करून कृषी कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्यात आली.
ते म्हणाले, या अन्यायकारक कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतीवर देखील व्यापारीकरणाचे संकट घोंघावत होते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी देशोधडीला लागण्याचा धोका होता. कृषी कायदे रद्द केल्याने आंदोलकांनी देशातील कृषी क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे. देशभरातील शेतकर्यांच्या एकजुटीचा आणि धाडसाचा हा मोठा विजय आहे.