आमदार बाबर  
सांगली

विटा : लोकांनी टाळ्या वाजवल्‍या म्‍हणजे सत्‍ता येते हा तुमचा भ्रम; आमदार बाबर यांचा राऊतांना टोला

निलेश पोतदार

विटा : पुढारी वृत्तसेवा परवा एकजण विट्यात येवून गेले आणि माझाच प्रचार करुन गेले. पुढचा आमदार शिवसेनेचाच! लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे सत्ता येते हा तुमचा भ्रम अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय राऊत यांना फटकारले.

खानापूर तालुक्यातील वाझर येथील पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आणि नवनिर्वाचित, सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार आमदार बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी खा. राऊत यांनी विट्यात येऊन केलेल्या टिकेवर तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले.

आमदार बाबर म्हणाले, टीकाटिप्पणीपेक्षा कामे महत्त्वाची. आता सगळीकडच झालंय. गद्दार गद्दार. पण गद्दार म्हणजे काय ? आम्ही पक्षाशी गद्दारी केली ? आम्हाला मिळालेलं मताधिक्य जनतेचं आहे. यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवाराला अडीचशे, पाचशे आणि हजार मतं मिळत होती. या अनिल बाबरला जनतेने २० हजार मताधिक्य दिले. पण तुम्ही जर दोन-दोन महिने आम्हाला भेटत नसाल तर आम्ही मतदारांना येऊन काय सांगायचं? आमचे नेते भेटले नाहीत म्हणून? आम्ही अनेक वेळा सांगितलं पण बदल झाला नाही. आता अशी कितीही बांडगुळे येतील, भाषणं करून जातील. त्यांना भिऊन चालतंय? ज्या कामासाठी आम्ही बंड केलं त्यांना वाटत असेल गद्दारी पण आता बदल तुम्हाला दिसत आहे.

सारखं म्हणताय ना पन्नास खोके आता दोघांचीही होवूदे इडी चौकशी. मी माझं ईडी चौकशीचे पत्र देतो, तुम्ही पण द्या. कळुदे एकदा लोकांना सत्य काय ते. लोकांना माहिती आहे. आम्ही काय आहोत ते. आम्ही बाहेर पडा म्हणत होतो, तेव्हा तुम्ही बाहेर पडला नाहीत आणि आता बाहेर पडलाय आम्हाला शिव्या घालायला. लोक टाळ्या वाजवतात म्हणून काही बोलता? लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे सत्ता येते हा तुमचा भ्रम आहे. नुसतं भाषण करून जाणं सोपं आहे, परंतु लोकांच्या काय अपेक्षा आहेत लोकांना काय पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे असे म्हणत लोकांची काम करणाऱ्यांनाच लोक निवडून देतात. त्यामुळे पुढचे सरकार ही शिवसेना भाजप युतीचेच येईल असा विश्वासही आमदार बाबर यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT