सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी वसुलीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे बँक अडचणीत येत आहे. शेतकर्यांकडेे मात्र छोट्या कर्जासाठी तगादा लावला जात आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अशोक माने यांनी केली आहे.
माने यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे की, बँकेचे अनेक बड्या थकबाकीदारांकडून वर्षांनुवर्षे मोठे येणे आहे. त्यामुळे बँक डबघाईला आली तरीही वसुली करण्यासाठी संचालक मंडळ व प्रशासनातील अधिकारी कडक भूमिका घेताना दिसत नाहीत. मार्चअखेर जवळ आला असतानाही अधिकारी, कर्मचारी खेळ खेळण्याला प्राधान्य देत आहेत. हे बँकेच्या दृष्टीने हितावह नाही. गेल्या वर्षभरात वसुलीची टक्केवारी केवळ 10.76 टक्के आहे. अनेक संस्था थकबाकीपोटी विकत घेतल्या आहेत. पण, त्या भाड्याने घेण्यास कोणी पुढे येत नाही. त्यामुळे बँकेचा नफा घटतो आहे. अनेक खाती एनपीएत जाऊनदेखील कडक कारवाई होत नाही.
त्यांनी म्हटले आहे की, विद्यमान संचालक मंडळाने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता वसुलीसाठी ठोस धोरण घेण्याचे ठरविले होते; पण कार्यवाही काहीच होताना दिसत नाही. परंतु शेतकर्यांना कर्जे देताना अनेक कागदपत्रांचा ससेमिरा मागे लावला जातो. शेती कर्जे देताना 7/12 वरील इतर हक्कातील मालकांचे नो-ड्यूज मागितले जाते. 25 ते 30 लाखांची जमीन तारण असताना शेतकर्यांना नाममात्र कर्ज देऊन बोळवण केली जाते. तसेच वसुलीसाठी नाहक त्रास दिला जातो. ऊस बिलातून कर्जाचा हप्ता लगेच कपात करून घेतला जातो, पण साखर कारखानादारांकडून अशी वसुली केली जात नाही.
सामान्य ठेवीदारांच्या पैशांची बड्या नेत्यांच्या संस्थांवर कर्जाद्वारे खैरात केली जाते. बँकेच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. हे प्रकार तातडीने थांबून सर्वच थकबाकीदारांना समान न्याय प्रशासनाने लावणे गरजेचे आहे; अन्यथा शेतकरी संघटना बँकेच्या दारात शंखध्वनी आंदोलन करणार आहे.