वायफळेतील महिला मंडल अधिकारी, कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात  Pudhari File Photo
सांगली

वायफळेतील महिला मंडल अधिकारी, कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

वायफळे (ता. तासगाव) येथील सजाच्या मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले (वय 40, रा. विश्रामबाग, सांगली) व कोतवाल प्रदीप प्रकाश माने (28, रा. वायफळे) यांच्यासह तिघांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोघांसह मध्यस्थ दत्तात्रय ऊर्फ राहुल संभाजी बाबर (29, रा. बस्तवडे) याच्याविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

बस्तवडे (ता. तासगाव) येथील तक्रारदार यांचे वडील व चुलते यांनी चुलत आजीची जमीन खरेदी केली होती. या जमिनीची सात-बाराला नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी मंडल अधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. खरेदी केलेल्या जमिनीबाबत गावातील एकाने नोंद करण्यास हरकत घेतली होती. तो तक्रारी अर्ज मंडल अधिकारी वाले यांच्याकडे आला होता. त्यानुसार तक्रारी अर्जावर वाले यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. सुनावणीत तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी वाले यांनी मध्यस्थ दत्तात्रय बाबर याच्यामार्फत दहा हजारांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदार यांनी 25 सप्टेेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने याची पडताळणी केली असता, हा प्रकार समोर आला होता. मंगळवारी वायफळे येथील मंडल अधिकारी कार्यालयासमोर लाचेची रक्कम घेताना कोतवाल प्रदीप माने याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडल अधिकारी वाले, कोतवाल माने व मध्यस्थ बाबर यांना अटक केली. त्यांच्याविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सीमा माने, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT