विटा : नांदणी (जि.कोल्हापूर) येथील वनतारा मध्ये नेलेल्या हत्ती बरोबरच विट्याच्या हत्तीचे काय झाले असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये विचारला आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठातील माधुरी हत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुजरातच्या जामनगर येथील वंतारा किंवा वनतारा येथे नेण्यात आला. हा विषय कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २० हून अधिक गावांमध्ये अतिशय संवेदनशील बनलेला आहे. ३९ वर्षांहून अधिक काळ असलेला हा सुदृढ निरोगी पेटा (पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स) या प्राणी मित्र संघटने च्या तक्रारीवरून वनतारा येथे नेण्यात आला आहे.
वनतारा हा अनंत अंबानी यांचा प्राणी बचाव, काळजी आणि पुनर्वसन खासगी उप क्रम आहे. तो जामनगर जिल्ह्यातील मोतीखाव डी गावात तब्बल साडेतीन हजार एकरमध्ये आहे. मात्र या हत्ती नेल्याच्या कारणावरून गेले आठ दिवस झाले कोल्हापूर जिल्हा धूमसत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे वनताराचे अधिकारी आणि नांदणी मठाचे महाराज तसेच आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्व संबंधितांची बैठक झाली.
या बैठकीनंतर खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपण वनतारा येथे नेण्यात आलेल्या हत्तींच्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्याचे सांगत विट्यातील एक हत्ती जो २०२३ साली वनतारामध्ये नेलाय त्याचे काय झाले ? त्याचे व्हिडिओ बाहेर येत नाहीत त्याच्याबद्दलची माहिती ही बाहेर येत नाही असे का असा ? सवाल आपण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडला. तसेच वनतारा आणि पेटा संघटनेच्या कामकाजाबद्दलही अनेक शंका उपस्थित केल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.
येथील भैरवनाथ यात्रा कमिटीचा ही गणेश हत्ती होता. २००६ मध्ये केरळ मधून तो पिल्लू असताना आणला होता. त्यानंतर तो १५-१६ वर्षे विटेकरांच्या सोबत लहानाचा मोठा झाला. मात्र ३ नोव्हेंबर २०२३ रोजी व्याधीग्रस्त झाला म्हणून त्यास उपचारासाठी जामनगर (गुजरात) येथे पाठविण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्या हत्तीचे नेमके काय झाले याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असतानाच आता थेट मुख्यमंत्र्यांसो बतच्या बैठकीमध्ये हा विषय पुन्हा निघाल्याने आणि विट्याच्या हत्तीबद्दलचीही माहिती नांदणीच्या हत्ती बरोबरच घेण्यात येईल अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितल्याने विटेकरांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे.