

तानाजी खोत
कोल्हापूर : भारताच्या जंगलांचा राजा वाघ असला, तरी त्याच्या विशाल साम्राज्याचा ‘शिल्पकार’ मात्र हत्ती आहे. केवळ एक वन्य प्राणी म्हणून नव्हे, तर भारताच्या शौर्याचा, संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा जिवंत साक्षीदार असलेला आशियाई हत्ती आज आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये आणि इतिहासाच्या पानांमध्ये हत्तीला मानाचे स्थान असले, तरी देशाच्या इतर भागांत त्याचे घर, म्हणजेच जंगल झपाट्याने कमी होत आहे. ही परिस्थिती नेमकी काय आहे, याचा हा आढावा.
महाराष्ट्रातही कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिरात असलेला ‘सुंदर’ (2014 मध्ये मृत), भवानी मंडपातील ‘बर्ची बहाद्दर’ (1970 मध्ये मृत) आणि नांदणी येथील जैन मठातील ‘महादेवी’ यांसारख्या हत्तींच्या आठवणी आजही ताज्या आहेत. याशिवाय जिल्ह्यातील कुंथुगिरी, उदगाव येथील मंदिरातदेखील हत्ती आहेत. मात्र, आता मंदिरांमधील हत्तींची संख्याही रोडावली आहे.
(वन्यजीव गणना 2017 नुसार)
एकूण जंगली हत्ती : सुमारे 27,000
सर्वाधिक हत्ती असलेली राज्ये : कर्नाटक (6,049), आसाम (5,719), केरळ (3,054)
मानव-हत्ती संघर्ष : दरवर्षी 400 पेक्षा जास्त माणसे आणि 100 हत्ती मृत्युमुखी पडतात.
अधिवास नष्ट होणे : वाढती शेती, रेल्वे मार्ग, रस्ते व खाणकामांमुळे जंगले तुटत आहेत. यामुळे हत्तींचे नैसर्गिक भ्रमणमार्ग (कॉरिडॉर) खंडित झाले आहेत.
वाढता मानव-हत्ती संघर्ष : हत्ती अन्नाच्या शोधात मानवी वस्ती व शेतांमध्ये घुसतात. यातून होणारा संघर्ष दोघांसाठीही जीवघेणा ठरत आहे.
अवैध व्यापार : रेल्वे रूळ व महामार्ग ओलांडताना अनेक हत्तींचा अपघाती मृत्यू होतो. सुळे असलेल्या नर हत्तींना आजही धोका कायम आहे.
प्रोजेक्ट एलिफंट (1992) : हत्ती, त्यांचे अधिवास व भ्रमणमार्ग यांचे संरक्षण करणे, मानव-हत्ती संघर्ष कमी करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत 101 ‘हत्ती कॉरिडॉर’ निश्चित करण्यात आले आहेत.
वन्यजीव संरक्षण कायदा (1972) : या कायद्याच्या ‘अनुसूची-1’ मध्ये हत्तींना सर्वोच्च संरक्षण दिले आहे. त्यांची शिकार करणे किंवा त्यांच्या अवयवांचा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा आहे.