महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी किशोर पुंडलिक महिंद्रकर यांचे सोमवारी न्युमोनिया व हृदयविकाराने निधन झाले. दरम्यान ‘कामाचा ताण, आजारी असतानाही रजा न देणे, बैठकीला हजर राहण्याची सक्ती, न्युमोनियाचे निदान या सर्वांचा परिणाम म्हणून महिंद्रकर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला, असा आरोप महापालिका कर्मचारी सभेचे सचिव दिलीप शिंदे, सहसचिव विजय तांबडे यांनी केला. मंगळवारी काळ्या फिती लावून काम करत प्रशासनाचा निषेध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी महिंद्रकर यांचे निधन झाल्याचे समजताच सोमवारी कर्मचारी महापालिकेच्या मंगलधाम प्रशासकीय कार्यालयासमोर एकत्र आले. महापालिका कर्मचारी महासभेचे सचिव शिंदे, सहसचिव तांबडे यांनी उपायुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली. कर्मचार्यांना रजा, सुट्टी दिली जात नसल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली जाणार आहे. शिंदे व तांबडे म्हणाले, महिंद्रकर यांना गेल्या आठवड्यात ताप आला होता. त्यांना रजा हवी होती. मात्र त्यांना रजा मिळाली नाही.
शुक्रवारी त्यांचा ताप वाढला. त्यातच शुक्रवारी प्रशासनाने पाणीपट्टी वसुलीसाठी बैठक बोलवली होती. 13 कोटी रुपये वसुलीचे उद्दीष्ट दिले होते. त्यामुळे ते मानसिक दबावाखाली होते. त्यातच त्यांना न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला. कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द करणे, रजा न देणे जादा कामाचा दबाव हे अन्यायी आहे. त्याविरोधात मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले जाईल. मंगळवारी आयुक्तांची भेट घेवून पुढील निर्णय घेतला जाईल.