Sangli Jewelers robbery attempt Vita
विटा : सांगली रस्त्यावरील पारे नाका परिसरात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव फसला असून, ते घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेमुळे विटा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारे नाका येथील आनंदा माळी यांच्या इमारतीत वासुंबे येथील महादेव शेठ पवार यांचे 'नयनम ज्वेलर्स' हे दुकान आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास ५ ते ६ अनोळखी चोरटे रेनकोट घालून आणि चेहरे झाकून दुकानाजवळ आले. त्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे लक्षात येताच, चोरट्यांनी कॅमेऱ्याची दिशा बदलली.
मात्र, दुकानाच्या शटरचे कुलूप तोडण्याचा आवाज शेजारील रहिवाशांच्या कानावर पडल्याने त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यावर त्यांनी आरडाओरडा सुरू केला. इतर रहिवासी जागे झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी इमारतीच्या मागच्या बाजूने पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. शटरच्या कुलपाची पट्टी तोडल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. अशा प्रकारच्या वाढत्या धाडसी गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने या टोळीचा छडा लावून कडक कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.