Vita road development issues
विटा : विट्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र १६० चे काम सुरू करण्यापूर्वी शहरातील दोन्ही बाजूंच्या रहिवाशी घरे आणि व्यवसायांबाबत काय भूमिका घेणार ? असा सवाल भाजप नेते, पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी प्रशासनाकडे केला आहे.
बारामती ते सांगली किंवा फलटण ते म्हैसाळ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० चे काम सध्या गार्डी हद्दीपर्यंत आलेले आहे. थोड्याच दिवसांत विटा शहरात ही या महामार्गाचे काम सुरू होईल. मात्र, शहरात इस्टीन हॉटेल ते सांगली रस्त्यावरील पेट्रोल पंपापर्यत दोन्ही बाजूंनी मोठी नागरी वस्ती आहे. याबाबत प्रशासनाची काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी भाजप नेते वैभव पाटील यांनी माजी नगर सेवक आणि कार्यकाऱ्यांसह मुख्याधिकारी विक्रम सिंह पाटील यांची भेट घेतली.
याबाबत वैभव पाटील म्हणाले की, या महामार्गाची कामे सुरू झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे. यावर आताच उपाययोजना आखणे गरजेचे आहे. भविष्यकाळात शासनाची प्रस्तावित कामे उदाहरणार्थ भुयारी गटार, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा या सारख्या नागरी सुविधाची कामे प्रलंबित आहेत. यावर काय निर्णय घेणार आहात ? त्याचबरोबरीने या महामार्गाच्या दोन्हीही बाजूने रहिवाशी लोकांची घरे तसेच लहान मोठ्या व्यवसायिकांची दुकाने आहेत. याबाबत आपण काय भूमिका घेणार आहात असे प्रश्न पाटील यांनी विचारले.
त्यावर प्रांताधिकारी बांदल यांनी संबंधित ठेकेदारास थेट फोन करून सर्वांसोबत समन्वयाची बैठक घेण्याविषयी सूचना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक अविनाश चोथे, दहावीर शितोळे, प्रशांत कांबळे, संजय सपकाळ, फिरोज तांबोळी, शरद पवार, विनोद पाटील, राहुल हजारे, तानाजी जाधव, विकास जाधव, माधव रोकडे, अमित भोसले, अभय जाधव, मैनुद्दीन पठाण, अक्षय गायकवाड, सत्यवान माने, शिवराज घोरपडे आदी उपस्थित होते.