ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील कार्वे येथील पाझर तलावात वाकुर्डे योजनेचे पाणी सोडल्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हा तलाव पूर्ण क्षमतेने पाण्याने भरेल का नाही, याची शाश्वती नव्हती. समाधानकारक पाऊस न झाल्याने हा तलाव 80 टक्के पाण्याने भरला होता. उर्वरित 20 टक्के भरण्यासाठी आ. सत्यजित देशमुख यांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या संबंधित विभागाच्या अधिकार्यांना सूचना देऊन पाणी सोडण्याचा आदेश दिला. तत्काळ पाणी सोडले. आठ दिवसातच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडू लागला. त्यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या तलावाच्या पाण्यावर अनेक शेतकर्यांची शेती अवलंबून आहे. त्याचबरोबर गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी या पाझर तलावातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
वाळवा तालुका सधन समजला जात असला, तरी कार्वे, ढगेवाडी, शेखरवाडी, ऐतवडे बुद्रुक परिसरातील शेती विहीर बागायतीवर अवलंबून आहे. ओढ्या, ओघळीवर अनेक बंधारे बांधले आहेत. त्या पाण्याचा खरीप, रब्बी पिकांसाठी मोठा उपयोग होतो.
वाकुर्डे योजनेचे पाणी कार्वे, ढगेवाडी तलावात दोन महिन्यांच्या अंतराने सोडले, तर तलावाखाली असणारे बंधारे पूर्ण क्षमतेने पाण्याने भरणार आहेत. भूजल पातळीत वाढ होऊन शेतकर्यांना बारमाही पिके घेता येतील. तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
पावसामुळे वाकुर्डे पाणी योजनेच्या भाग क्रमांक दोनची अनेक कामे खोळंबली आहेत. पावसाने पूर्ण उघडीप दिल्यानंतर कामाला गती येईल.नितीश पोतदार, कार्यकारी अभियंता, वारणा कालवे विभाग, इस्लामपूर.
ढगेवाडी, जक्राईवाडी तलावांपेक्षा कार्वे तलावातील पाण्याची साठवणूक क्षमता जास्त आहे. या पाण्यावर अनेक शेतकरी बारमाही पिके घेत आहेत. त्याचबरोबर गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी या पाझर तलावाचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने वाकुर्डेचे पाणी या तलावात सोडले, तर रब्बी पिके पदरात पडतील.विठ्ठल गडकरी, माजी सरपंच, कार्वे.