विटा : पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात झाले, या गोष्टीला महत्व आहे, बाकी श्रेयवादाच्या लढाईत आपल्याला फार रस नाही, आता या मतदार संघातील उर्वरित गावांचा डोंगरी भागात समावेश करा, अशी आमची जुनी मागणी अधिवेशनात मांडून सकारात्मक निर्णय करून घ्या, असे आवाहन युवा नेते, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य वैभव पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांना केले.
वैभव पाटील यांचा खानापूर घाटमाथा च्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते बोलत होते. (Shivaji University Khanapur subcenter)
यावेळी गटनेते राजेंद्र माने, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगराध्यक्ष अलिअकबर पिरजादे, नगरसेवक आनंदराव स्वामी, नगरसेवक सुहास ठोंबरे, नगरसेवक मारुती भगत, प्राचार्य डॉ.निवास वरेकर, डॉ.विजय मुळीक,अशोक भगत, माणिक भगत यांच्यासह तालुक्यातील अनेक गावातील सरपंच आणि उपसरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वैभव पाटील म्हणाले, आपल्या संस्थेची इमारत विद्यापीठाच्या उपकेंद्रास सुरूवातीला देण्यास तयार आहोत. परिसरात नवनवीन शैक्षणिक दालने खुली करून इथल्या तरुणांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून अद्ययावत शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर नवनवीन अभ्यासक्रम आणि संशोधन या ठिकाणी व्हावे, यासाठी यापुढेही प्रयत्न करू. तसेच कोणतीही मदत लागल्यास सदैव सहकार्य करू , असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी राजेंद्र माने, मारुती भगत, प्राचार्य डॉ. निवास वरेकर, डॉ.विजय मुळीक आदींचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाला नगरसेवक बद्री नाथ गिड्डे, सरपंच विवेक गायकवाड, पिंटू जाधव, विक्रम डीसले, विद्यार्थी प्रतिनिधी विठ्ठल भगत, अक्षय भगत, ऋषीकेश देसाई, राहुल ठोंबरे, शाहरुख पठाण,रुपेश पवार आदी उपस्थित होते.
जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर (फ्लेक्स) माजी आमदार सदाशिवराव पाटील, सत्कारमूर्ती वैभव पाटील याबरोबरच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची इमारतीचा फोटो आणि १० जानेवारी २०२४ रोजीच्या 'दै. पुढारी' मधील उपकेंद्र खानापूरला होणार असल्याची बातमी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.