सांगली : मोटारींच्या धडकेत दाम्पत्य ठार

वांगीजवळ भीषण अपघात; पाचजण गंभीर जखमी; मृत सातारा जिल्ह्यातील खटावचे
Sangli News
सांगली : मोटारींच्या धडकेत दाम्पत्य ठार
Published on
Updated on

कडेगाव/वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील वाल्मिकनगर येथे जुना सांगली-सातारा रस्त्यावर दोन मोटारींच्या भीषण अपघातात खटाव (जि. सातारा) येथील विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते हे पती-पत्नी जागीच ठार झाले, तर दोन्ही मोटारींमधील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवार, दि. 20 रोजी रात्री 11.45 वाजता ताकारी योजनेच्या कालव्यावरील पुलाजवळ घडला.

याबाबत अधिक माहिती अशी, खटाव येथील विकास भिकू मोहिते हे मोटारीतून (क्र. एमएच 42 एएच 1047) ताकारी (ता. वाळवा) येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते. गुरुवारी रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून ते पत्नी पुष्पा आणि इतर नातेवाईकांसह वांगी-कडेपूरमार्गे खटाव येथे परतत होते. याचवेळी जमीर ईलाही आवटी (रा. महाबळेश्वर, जि. सातारा) हा प्रवासी मोटार (एमएच 11 डीबी 5797) घेऊन महाबळेश्वरहून कडेपूर-वांगीमार्गे सांगलीच्या दिशेने निघाला होता. वांगी येथील वाल्मिकनगर परिसरात ताकारी योजनेच्या कालव्यावरील पुलाजवळ जमीर आवटीच्या मोटारीने समोरून येणार्‍या विकास मोहिते यांच्या मोटारीस जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही मोटारींच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात मोहिते दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या मोटारीतील ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहित तोरसे, आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले. प्रवासी मोटारीचा चालक जमीर आवटी हादेखील जखमी आहे. जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत ऋतुजा रोहित तोरसे (रा. खटाव) यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपनिरीक्षक योगेश शेलार अधिक तपास करत आहेत.

ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुसेसावळी-वाकुर्डे रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप कडेगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कृष्णत मोकळे यांनी केला आहे. या अपघाताला संबंधित ठेकेदार जबाबदार असून, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news