प्रवीण कोळपे 
सांगली

UPSC Result |उसनवार करुन आईने शिकवले, प्रवीणने केले कष्टाचे चीज : UPSC परीक्षेत मारली बाजी, देशात ५८४ वी रँक

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आटपाडी तालुक्यातील मिटकीच्या प्रवीण कोळपेची भरारी

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील जेमतेम हजार–बाराशे लोकसंख्या असलेल्या मिटकी या छोट्याशा गावातील प्रवीण उत्तम कोळपे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परीक्षेत देशात ५८४ वी रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत मिळवलेल्या या यशामुळे आटपाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

खरसुंडीपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मिटकी या छोट्याशा गावात प्रवीणचे बालपण गेले. अवघ्या हजार लोकसंख्या असलेल्या या गावात फक्त प्राथमिक शाळेची सुविधा असल्याने माध्यमिक शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना खरसुंडी येथे जावे लागते. प्रवीणचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, तर माध्यमिक शिक्षण खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले.

यानंतर सांगली येथील विलिंगडन कॉलेजमध्ये त्याने उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे आटपाडीतील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच त्याच्या मनात स्पर्धा परीक्षेचे स्वप्न आकार घेऊ लागले आणि त्याने UPSC ची तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तो एक वर्ष दिल्लीत गेला. मात्र तिथल्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने त्याला परत कराड येथे यावे लागले. कराडमध्ये राहून खाजगी शिकवण्या घेत आणि स्वतः अभ्यास करत तब्बल सहा वर्षे त्याने अथक परिश्रम घेतले.

दरम्यान, २०२१ साली त्याच्या आयुष्यात मोठा आघात झाला. त्याचे वडील उत्तम कोळपे यांचे निधन झाले. मुलाने शिकून मोठे व्हावे, अधिकारी व्हावे, असे स्वप्न वडिलांनी पाहिले होते. मात्र नियतीने प्रवीणच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हिरावून घेतले. या दुःखातून सावरत त्याने पुन्हा धैर्याने अभ्यासाला सुरुवात केली.

प्रवीण हा कुटुंबातील मोठा मुलगा असून त्याला एक लहान भाऊ आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आईवर आली. आईने दुःख पचवत स्वतःच्या शेतात काम केले, मोलमजुरी केली आणि मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यक तेवढे पैसे उभे केले.

अनेक वेळा उसनवार करूनही मुलाचे शिक्षण थांबू दिले नाही. आईच्या कष्टाचे आणि त्यागाचे चीज करत प्रवीणने अखेर UPSC मध्ये ५८४ वी रँक मिळवत यशाची शिखरे गाठली. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि वडिलांचे छत्र हरवले तरी मनात ठाम ध्येय असेल, जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही अशक्य नसते, हे प्रवीण कोळपेने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. त्याच्या या यशामुळे आटपाडी तालुक्याच्या युवकांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.मिटकी येथे प्रवीण कोळपे वर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षांव केला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT