सांगली : भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज-शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. भाजप महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ शिराळा व सांगली येथे शहा यांची प्रचार सभा होणार आहे. भाजपने या सभांची जय्यत तयारी केली आहे.
शिराळा येथे भाजप महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी 10 वाजता शिराळा येथे विश्वासराव नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर शहा यांची सभा होणार आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार सदाभाऊ खोत, महायुतीचे इस्लामपूरचे उमेदवार निशिकांत पाटील तसेच सम्राट महाडिक, राहुल महाडिक उपस्थित राहणार आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी 2 वाजता सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. पालकमंत्री व भाजप महायुतीचे मिरज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश खाडे तसेच महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. भाजपने या सभेची जय्यत तयारी केली आहे.