Uday Samant file photo
सांगली

Uday Samant: वाद चार भिंतीत ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही: मंत्री उदय सामंत यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

मतभेद बाजूला ठेवून काम करा. पक्षातील गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

पुढारी वृत्तसेवा

Uday Samant

सांगली : जिल्ह्यातील अनेक भागात शिंदे शिवसेनेची ताकद आहे. मात्र, ती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबात वाद असतात, तसेच संघटनेतही असतात. मात्र, ते चारचौघांत चव्हाट्यावर आणू नका. वादापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. मतभेद बाजूला ठेवून काम करा. पक्षातील गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

येथे शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख योगेश जानकर, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, गौरव नायकवडी, संजय विभुते, मोहन वनखंडे, महादेव सावंत, महेंद्र चंडाळे, सुनीता मोरे, उत्तम कांबळे उपस्थित होते.

सामंत म्हणाले, प्रत्येक कुटुंबात वाद असतात. पक्षातही असतात. मात्र, लोकांसमोर त्याचे प्रदर्शन करू नका. त्यामुळे पक्षाचे नुकसान होते. पक्षाच्या बैठकीला कोण उपस्थित असते, कोण काम करते आणि कोण मुद्दाम वाद घालते, याची संपूर्ण माहिती घेतली जाते. त्यामुळे निष्ठेने काम करणाऱ्यांना भविष्यात संधी मिळेल.

ते म्हणाले, प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये ताकद आहे. मात्र, मतभेद आणि मनभेदांमुळे पक्षाचे नुकसान झाले. यापुढे हे चालणार नाही. ते म्हणाले, काहीजण वारंवार मुंबईला येतात. हॉटेल बुक करून राहतात. मात्र, मुंबईला येण्यापेक्षा स्थानिक पातळीवर लोकांच्या अडीअडचणी समजून घ्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. चांगले काम करणाऱ्यांना पद मिळेल.

बाजूला बसा किंवा मांडीवर, पण संघटना मजबूत करा

निवडणुकीत लढाई झाली की मित्रपक्षांसोबत विरोधकांसोबत झाली, हे सतत चघळत बसू नका. बजरंग पाटील आणि मोहन वनखंडे यांनी एकमेकांच्या बाजूला बसावे अथवा मांडीवर, पण समोरच्यांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. वाद बाजूला ठेवून संघटना मजबूत करा, असा सल्लाही मंत्री सामंत यांनी दिला.

तानाजी पाटील अर्ज मागे घेतील: मंत्री सामंत

विधानपरिषदेच्या निवडणुकीचे जागा वाटप रविवारी रात्री अंतिम होईल. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल करताना त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही किंवा पक्षाने त्यांना अर्ज दाखल करायला सांगितला नाही. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. निश्चित ते अर्ज मागे घेतील, असा विश्वासही मंत्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT