चांदोलीच्या नैसर्गिक जंगलात वाघिणीची मुक्ती  
सांगली

Sangli News : चांदोलीच्या नैसर्गिक जंगलात वाघिणीची मुक्ती

ताडोबातून आणलेली तारा वाघीण : सात दिवसापासून होती नियंत्रित पिंजऱ्यात

पुढारी वृत्तसेवा

आष्पाक आत्तार

वारणावती : ताडोबातून आणलेली तारा वाघीण गुरुवारी सकाळी आठ वाजता चांदोलीच्या नैसर्गिक जंगलात मुक्त झाली. सात दिवसापूर्वी चांदोलीत आणलेली ही वाघीण नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आली होती. वाघीण त्याच एन्क्लोजरमध्ये आत फिरत होती. तिने आतमध्ये शिकार केली व ती खाऊन तेथेच आत दोन दिवस राहिली. दोन दिवस दरवाजा उघडा ठेवला होता, तरी ती बाहेर गेली नाही. सकाळी मात्र ती अत्यंत डौलदारपणे चालत नैसर्गिक जंगलात निघून गेली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र संख्या वाढविण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य झाला.

चांदोलीत आगमनानंतर वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्र चिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले.

वैज्ञानिक मॉनिटरिंग आणि पश्चात निरीक्षण योजना

वाघिणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आले असून तिचे या माध्यमातून 24 तास पर्यवेक्षण केले जाणार आहे. या कामासाठी सह्याद्री व्याघ्र राखीव व चांदोली राष्ट्रीय उद्यान तसेच भारतीय वन्यजीव संस्थेचे प्रशिक्षित पथक नियुक्त करण्यात आले आहे.राज्य शासन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली राष्ट्रीय उद्यान व भारतीय वन्यजीव संस्था यांच्या एकत्रित सहकार्याने व्याघ्र पुनर्वसन व संवर्धनाची दिशा अधिक भक्कम होत राहील. पर्यावरण संरक्षण व जैवविविधतेच्यादृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, रमण कुलकर्णी, वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील (चांदोली), अर्शद मुलानी (हेळवाक), अक्षय साळुंखे (कोयना), तुषार जानकर (पाटण), किरण माने (ढेबेवाडी), प्रदीप कोकीटकर (आंबा) व वनपाल, वनरक्षक सहभागी होते. उपग्रह व व्हीएचएफ आधारित हालचाल व ठिकाणांची माहिती फील्ड पथकाद्वारे घेतली जाणार आहे. क्षेत्रनिहाय पडताळणी, हालचाल, निवास व शिकार पद्धतीची नोंद ठेवली जाईल. मानव-वन्यजीव संघर्ष प्रतिबंधात्मक उपाय, तत्पर व्यवस्था केली जाईल. तत्कालीन मुख्य वनसंरक्षक डॉ. कलेमेंट बेन, पापा पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे तथा नाना खामकर यांनी गेली आठ ते दहा वर्षे या व्याघ्र पुनर्वसनसाठी अथक्‌‍ प्रयत्न केले. त्यामुळे सह्याद्रीमध्ये व्याघ्र पर्यटनास चालना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT