सांगली

सांगली : २४ तासात कडेगाव पोलिसांनी चोरांना ठोकल्या बेड्या

Shambhuraj Pachindre

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : मोटरसायकल चोरांना २४ तासांत अटक करण्यात कडेगाव पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ७० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. रोहित शिवाजी मोरे (वय-२४, मूळगाव अमरापूर, सध्या रा.स्वामी समर्थ मठाजवळ कडेगाव) व जीवन कोरडे (वय-२१ रा. कडेगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि.२९) रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कडेगाव एमआयडीसीमध्ये अंतर्गत रस्त्याकडेला प्रविणकुमार महादेव भोसले (रा.खंबाळे औध,ता.कडेगाव) हे त्यांची मोटरसायकलसह (एम.एच.10.बी. वाय.3759) थांबले होते.

यावेळी संशयित जीवन कोरडे व रोहित मोरे यांनी चेहरा लपवत फिर्यादी भोसले यांना चाकुचा धाक दाखवला. तसेच लाथाबुक्कयांनी मारहाण करुन त्यांची मोटरसायकल व ३२० रूपये रोख रक्कम असा एकूण ७० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत प्रविणकुमार भोसले यांनी कडेगाव पोलिसात काल गुरुवारी (दि.३१) फिर्याद दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तपासाची चक्रे गतिमान करत गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस पथकास योग्य त्या सुचना दिल्या होत्या. तर सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींची टीप मिळताच पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोलीस पथकाने संशयित जीवन कोरडे व रोहित मोरे या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली. तसेच त्यांचेकडुन गुन्ह्यातील जबरीने चोरी केलेली मोटरसायकल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, पोलीस सतिश झेंडे, शिवाजी माळी, पुंडलिक कुंभार, अमोल जाधव, संकेत सावंत, नरेंद्र यादव यांनी केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT