नाथबाबांच्या नावानं चांगभलं...' "खरसुंडीत गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण" file photo
सांगली

नाथबाबांच्या नावानं चांगभलं...' "खरसुंडीत गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण"

खरसुंडीत २.५ लाख भाविकांच्या साक्षीने सासनकाठी व पालखी सोहळा साजरा

पुढारी वृत्तसेवा

The Sasankathi and Palkhi procession was celebrated in Kharsundi, witnessed by 2.5 lakh devotees

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा

नाथबाबांच्या नावानं चांगभलंऽऽ'च्या जयघोषात आणि गुलाल, खोबऱ्याच्या मुक्त उधळणीत खरसुंडी येथे सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा अमाप उत्साहात पार पडला, रणरणत्या उन्हात सुमारे २. ५ लाखांहून अधिक भाविकांनी नाथनगरीत हजेरी लावली. बुधवारी दुपारी श्रींचा रथोत्सव होणार आहे.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेसाठी लाखोच्या संख्येने भाविक खरसुंडीत दाखल झाले होते. सिद्धनाथ व जोगेश्वरी विवाहसोहळ्यानिमित्त होणारा हा पालखी सोहळा पाहण्यासाठी नाथनगरी भरून गेली होती.

चैत्र वद्य दशमीला देवाची लोखंडी सासने धावडवाडीचे मुस्लिम व विठलापूरचे बाड यांनी स्नानासाठी घोडे खूर येथे नेली. त्यानंतर ती जोगेश्वरी मंदिरात परत आणली. सकाळी सासनकाठी व पालखीने मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरुवात झाली. पहाटे मुख्य मंदिरात अभिषेक झाल्यानंतर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची पूजा बांधण्यात आली. देवाला भरजरी फेटा, अंगरखा, हातात तलवार, तर देवीला लाल साडी, सौभाग्यअलंकार अशी सालंकृत बांधलेली पूजा पाहून भाविक तृप्त झाले.

सकाळी अकरानंतर गावोगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होऊ लागल्या, मंदिराच्या आवारात सासनकाठ्या आल्यानंतर पारंपरिक वांद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या. दर्शनासाठी आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोबऱ्याची उधळण करीत होते. त्यामुळे नाथनगरीने गुलाबी चादर पांघरल्याचा आभास होत होता.

दुपारी एक वाजता नाथ निमंत्रक नयाबा गायकवाड यांचे वंशज प्रथम मानकरी गायकवाड बंधू यांना पुजारीबांधव मंदिरात घेऊन येतात. नंतर आटपाडीचे मानकरी देशमुख यांना घेऊन येण्यासाठी पुजारी व गायकवाड जातात. ते दुपारी त्यांना मंदिरात घेऊन आले. त्यानंतर पालखी सोहळ्यास सुरुवात झाली.

आटपाडीच्या पाटील बंधूंची पांढरीशुभ्र सासनकाठी मंदिरात दाखल झाली, यावेळी गावोगावच्या मानकऱ्यांना मंदिरात निमंत्रित करण्यात आले. दोन वाजता धावडवाडीच्या मुस्लिम व विठलापूरच्या हिंदू मानकऱ्यांनी एकत्र नैवेद्य अर्पण केला. अग्रभागी मंदिरातील पुजारी धूपारती, सेवेकरी, मानकरी, भालदार, चोपदार अशा पारंपरिक व शाही लवाजम्याने पालखीसह प्रस्थान केले. नगारखाना प्रवेशद्वारातून पालखी तीन वाजता मुख्य पेठेत दाखल झाल्यावर भाविकांनी 'चांगभलंऽऽ'च्या गजरात गुलाल व खोबऱ्याची एकच उधळण केली.

यावेळी मुख्य पेठेसह संपूर्ण आसमंत गुलालानं रंगून गेला होता. मुख्य पेठेतून गुलाल, खोबऱ्याची उधळण झेलत पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात पोहोचला. तत्पूर्वी महादेव मंदिराच्या प्रांगणात सर्व सासनकाठ्या पालखीला टेकवून सलामी देण्यात आली.

जोगेश्वरी मंदिरात पान-सुपारी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे टकऱ्या पडती यांनी सासनकाठीला टक्कर दिली व पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. यावेळी पालखीसोबत देवाच्या लोखंडी सासनकाठ्या होत्या. 'चांगभलंऽऽ' च्या गजरात पालखी मुख्य मंदिरात पोहोचल्यानंतर श्रीफळ वाढवण्यास सुरुवात झाली.

यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती, महसूल व पोलिस प्रशासन, सेवेकरी व मानकरी यांनी परिश्रम घेतले. सेवाभावी संस्था आणि सिद्ध नाथांच्या भक्तांनी अन्नदान आणि पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला. आटपाडी, सांगोला, विटा, खानापूर आणि अन्य आगारामार्फत जादा बस सोडल्याने भविकांची चांगली सोय झाली.

हिंदू-मुस्लिम ऐक्य...

खरसुंडीच्या सिद्धनाथ मंदिरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा जपली जाते. मुस्लिम बांधवांना लोणारी समाजातील याड बांधवांसह लोखंडी सासनकाठीचा मान आहे. मुस्लिम बांधव असलेल्या चावडवाडी गावाने लोकवर्गणीतून सिद्धनाम मंदिर उभारले. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्य जोपासले जात आहे. पूर्वी सिद्धनाथ मंदिरातील कपडे खरसुंडीत मोहरम सणातील ताबुतासाठी वापरले जात. या सोहळ्यात हिंदू बांधवही सामील होत. कित्येक मुस्लिम बांधव आजही सिद्धनाचाच्या चरणी नवस बोलतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा आदर्श आदर्शवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT