The mobile went from the garbage to the bell jar
सांगली : कचर्‍यातून आलेला मोबाईल गोरे यांना परत करताना महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक व घंटागाडी चालक, कर्मचारी. Pudhari Photo
सांगली

कचर्‍यातून मोबाईल गेला घंटागाडीत

पुढारी वृत्तसेवा

सांगली, पुढारी वृत्तसेवा : भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलाबरोबर 25 हजार रुपयांचा मोबाईलही महापालिकेच्या घंटागाडीत गेला. घंटागाडी निघून गेल्यानंतर काही वेळाने घरातील व्यक्तींना कळाले की मोबाईलही कचर्‍याबरोबर गेला आहे. मग फोनाफोनी झाली आणि कचर्‍याची ती घंटागाडी परत आली. घंटागाडीतील कचर्‍यात मोबाईल सापडला.

प्रभाग क्रमांक नऊ मधील सिध्देश्वर हौसिंग सोसायटीत सकाळी गोरे यांच्या घरी स्वयंपाकाची लगबग सुरू होती. घरात भुईमुगाच्या शेंगा फोडून त्यातील शेंगदाणे काढण्याचे काम सुरू होते. शेंगा फोडल्यानंतर त्याची टरफले एका कागदावर ठेवली जात होती. त्या कागदावरच मोबाईलही होता. तेवढ्यात महापालिकेची घंटागाडी आवाज करत आली. घंटागाडी आल्याचे पाहून घरातील अन्य एका सदस्याने शेंगाच्या टरफलाचा कागद तसाच गुंडाळला आणि कचर्‍या पिशवीत टाकला. गुंडाळलेल्या कागदात मोबाईलही होता. कचर्‍याची पिशवी घंटागाडीत टाकली. घंटागाडी निघून गेली.

मोबाईल घंटागाडीतून गेल्याचे कळताच त्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांना फोन केला. संतोष पाटील यांनी मुकादम बाबासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधला. संबंधित घंटागाडीतील कचरा खाली न करण्याबाबत चालकास सांगितले. स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, मुकादम बाबासाहेब जाधव, घंटागाडी चालक नुमान नगाराजी, राजेंद्र थोरात आणि तानाजी लोंढे यानी घंटागाडी त्या नागरिकाच्या घरासमोर नेली आणि त्यांच्या समोरच मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. यावेळी गोरे यांनी टाकलेल्या कचर्‍यामध्ये मोबाईल आढळून आला.

SCROLL FOR NEXT