शिराळा ः पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीनंतर युती सरकार घाबरले आहे. त्यांनी आता तिजोरीचे दारच काढून ठेवले आहे. या सरकारच्या राज्यात लाडकी बहीण सुरक्षित नाही. लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी नसून खुर्चीसाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
शिराळा येथे शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. खा. अमोल कोल्हे, आ. मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आ. अरुण लाड, आ. सुमन पाटील, देवराज पाटील, अमरसिंह नाईक, विराज नाईक, रणधीर नाईक, सम्राटसिंग नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, हे सरकार न मागता रस्त्यांसाठी खर्च करत आहे, न मागता सर्व भेटवस्तू पोहोच करत आहेत. ही सर्व कामे मलिदा मिळविण्यासाठी सुरू आहेत. भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. ते म्हणाले, मानसिंगराव नाईक या मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
आ. मानसिंगराव नाईक म्हणाले, 1995 पासून या मतदारसंघात विकास प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. मला जे काम सुचवले ते मी केले आहे. वडिलांनी उभा केलेला साखर कारखाना, दूध संघ विरोधकांनी विकला, आता ते मतदारसंघ सुद्धा विकायला मागे पुढे पाहणार नाहीत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले की, शिराळा विधानसभा मतदारसंघ हा राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेणारा मतदारसंघ आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, विराज नाईक, रणधीर नाईक, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनील गवाणे, तालुकाध्यक्ष बी. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पी. आर. पाटील, मनोज शिंदे, भूषण नाईक, बी. के. नायकवडी आदी उपस्थित होते. बी. के. नाईकवडी यांनी प्रास्ताविक केले. विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. विजयराव नलवडे यांनी आभार मानले.
खा. अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अडीच वर्षात कृतज्ञतेची भावना संपली आहे. बहिणी सुरक्षित नसतील, तर लाडकी बहीण म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.