सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या मतदानादरम्यान बोगस मतदानाच्या आरोपातून मोठा वाद निर्माण झाला आहे. तासगावमधील एका मतदान बूथवर बोगस मतदान सुरू असल्याचा आक्षेप आमदार रोहित पाटील यांच्या गटातील बूथ प्रतिनिधींनी घेतला. विरोधी गटाने हातातील मतदार याद्या हिसकावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या माहितीची खबर मिळताच आमदार रोहित पाटील तात्काळ मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यानंतर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादी झाली. परिस्थिती काही वेळातच चिघळली आणि दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या दिशेने धावत गेले. धक्काबुक्की आणि गोंधळाचा वातावरण निर्माण झाला.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी केली आणि दोन्ही गटांना वेगळे केले.
सध्या या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून कोणतीही अनिष्ट घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या दिवशी असा प्रकार घडल्याने तासगाव शहरात चर्चा रंगल्या असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.