तासगाव आगाराच्या चिंचवड-तासगाव बसचा (क्रमांक MH10DT-3995) मंगळवारी दुपारी येळावी (ता. तासगाव) परिसरातील निळकंठ बंगल्याजवळ अपघात झाला. बस तासगावकडे येत असताना चालकाचा अचानक ताबा सुटला आणि बस रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीच्या दिशेने भरधाव वेगाने गेली.
काही क्षणातच बस विहिरीच्या कठड्याजवळ जाऊन थांबली, त्यामुळे बस विहिरीत कोसळण्याचा मोठा धोका टळला. या घटनेमुळे बसमधील प्रवासी आणि चालक-वाहक यांना मोठा धक्का बसला. अपघाताच्या वेळी बसमध्ये काही प्रवासी होते, मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच तासगाव आगाराचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघातामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला सुरक्षेसाठी कठडे अधिक मजबूत करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.