खून प्रकरणातील संशयित आरोपी ३ महिन्यानंतर जेरबंद, विटा पोलिसांची कारवाई file photo
सांगली

Vita Crime News : खून प्रकरणातील संशयित आरोपी ३ महिन्यानंतर जेरबंद, विटा पोलिसांची कारवाई

विटा येथील मायाक्कानगर येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून सोबत काम करणाऱ्या कामगाराचा झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडका मारून निर्घृण खून केला होता.

पुढारी वृत्तसेवा

Suspected accused in murder case jailed after 3 months, Vita police action

विटा : पुढारी वृत्तसेवा विटा येथील मायाक्कानगर येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून सोबत काम करणाऱ्या कामगाराचा झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडका मारून निर्घृण खून करणाऱ्या परप्रांतीय संशयित आरोपीला तीन महिन्यांनंतर विटा पोलिसांनी जेरबंद केले. त्याला सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अशोक मगन कुम्हार उर्फ हरीजन (वय २९ वर्षे, रा. ग्राम बकैनी, पोस्ट सवदंड, तहसील बांसी, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, विटा- सांगली रस्त्यालगतच्या मायाक्कानगर येथील दयानंद पांडुरंग साबळे (वय ६१) यांच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी फरशी बसवण्याचे काम सुरू होते. २९ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारा स सोबत काम करणारे कामगार राजमन राजाराम कुम्हार (वय २८, रा. उत्तर प्रदेश) आणि अशोक कुम्हार यांच्यात किरकोळ कारणावरून जोरदार वाद व शिवीगाळ झाली. या वादाचा राग मनात ठेवून राजमन खोलीत झोपलेला असताना, संशयित अशोक कुम्हार याने बांधकामाच्या भरीव लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पसार झाला. उपचारापूर्वीच राजमन याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चित्रपटासारखा पाठलाग आणि चकमा

गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी अशोक कुम्हार हा मोबाईल, सोशल मीडिया किंवा फेसबुकचा कोणताही वापर करत नव्हता. तसेच त्याने आपल्या नातेवाइकांशी किंवा मित्रांशी सर्व संपर्क तोडले होते. उत्तर प्रदेशा तील त्याच्या मूळ गावी पोलीस पथक पाठवले असता तेथूनही तो पसार असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयातून वॉरंट काढूनही आरोपीचा कोणताही सुगावा लागत नसल्याने हे प्रकरण विटा पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरले होते.

अशा आव्हानात्मक परिस्थितीत पोलिसांनी मिळवला सुगावा

कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना विटा पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान तो मध्य प्रदेशातील खांडवा येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र पोलीस पथक तेथे पोहोचण्यापूर्वीच आरोपी सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) भागात पळून गेल्याचे निष्पन्न झाले. विटा पोलिसांच्या पथकाने लागलीच सिल्लोड गाठून सापळा रचला आणि अजिंठा-सिल्लोड रस्त्यावरून त्याला ताब्यात घेतले. विटा न्यायालयाने संशयित आरोपी अशोक यास २ डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.

ही कामगिरी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील, हवालदार अमोल पाटील, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, राजेंद्र भिंगारदेवे, हेमंत तांबेवाघ, विलास मोहिते, वैभव कोळी, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, महेश देशमुख, किरण पाटील आणि अमित मोरे यांच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT