NCP youth Congress Meeting Online Pudhari
सांगली

NCP youth Congress Meeting | ...तर 'करेक्ट कार्यक्रम' करणाऱ्यांचाच करेक्ट कार्यक्रम झाला असता; सुरज चव्हाणांचा जयंत पाटलांना थेट इशारा

NCP youth Congress Meeting | काँग्रेसचे (अजित पवार गट) युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर थेट टीकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

विटा: "विधानसभेच्या वेळी इस्लामपूरचा बॉल अगदी टप्प्यात आला होता, पण थोडक्यात हुकला. नाहीतर ज्यांना इतरांचा 'कार्यक्रम' करायची सवय आहे, त्यांचाच 'करेक्ट कार्यक्रम' झाला असता. पण आता पुढच्या वेळी कुणालाही सुट्टी द्यायची नाही," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर थेट टीकास्त्र सोडले.

विटा येथे आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 'युवा संवाद मेळाव्या'त ते बोलत होते. या मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सांगली जिल्ह्यातील आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैलवान सत्यजित पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, याच कार्यक्रमात सुरज चव्हाण यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

'ज्यांची पात्रता नाही, तेही अजितदादांवर टीका करू लागले'

आपल्या भाषणात सुरज चव्हाण यांनी पक्षाच्या संघर्षावर भाष्य केले. ते म्हणाले, "लोकसभा निकालानंतर अनेकांना वाटले की राष्ट्रवादी काँग्रेसचे दुकान आता बंद पडणार. नेतृत्वात काही दम राहिला नाही, असे समजून अनेक जण पक्ष सोडून गेले. ज्यांची पात्रता नाही, ते लोकसुद्धा अजितदादांवर टीका करू लागले. मात्र, अजितदादांनी शांतपणे लोकांमध्ये जाऊन सरकारने केलेली कामे सांगितली आणि जनतेने मोठ्या विश्वासाने ४२ आमदार निवडून दिले. अजितदादांची ओळख ही सर्वसमावेशक नेतृत्व म्हणूनच आहे."

'दहा घरं फिरणारे आता निष्ठेच्या गप्पा मारत आहेत'

चव्हाण यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. "जे लोक दहा घरं फिरून आले आहेत आणि आता निष्ठावंतांचे मेळावे घेत आहेत, त्यांनी आधी आपली राजकीय पार्श्वभूमी तपासावी. आपण देवाला फसवून इथपर्यंत आलो आहोत, याचा विचार करायला हवा," असा टोला त्यांनी लगावला.

कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आवाहन

कार्यकर्त्यांना संबोधित करताना चव्हाण म्हणाले, "सांगली जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, तेच वैभव आपल्याला पुन्हा मिळवायचे आहे. आपण कोणाच्या वाटेला जायचे नाही, पण जर कोणी तुमच्या अंगावर आले, तर त्याला थेट शिंगावर घ्या. आमचा पक्ष महात्मा गांधींच्या विचारांना मानतो, पण गरज पडल्यास भगतसिंग यांच्या विचारांनीही प्रेरित होतो." या मेळाव्याच्या माध्यमातून चव्हाण यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक आक्रमक राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT