Sangli : माऊलींच्या गजरात मच्छिंद्रनाथ पालखीचे स्वागत

आटपाडीत रिंगण सोहळा उत्साहात : हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
Sangli News
माऊलींच्या गजरात मच्छिंद्रनाथ पालखीचे स्वागत
Published on
Updated on

आटपाडी : ‘माऊली, माऊली’च्या अखंड जयघोषात आणि भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात जगद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा आटपाडीतील अंबाबाई मंदिर परिसरात मोठ्या भक्तिमय आणि उत्साहात पार पडला. या सोहळ्याला हजारो भाविक आणि वारकर्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परंपरेचा वारसा जपला.

सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या वारकर्‍यांच्या गर्दीत मैदान गजबजून गेले होते. रिंगणासाठी सजवलेल्या मैदानात महिला आणि वारकर्‍यांनी टाळ, मृदंग आणि भजनी मंडळाच्या गजरात फेर्‍या मारल्या. त्यानंतर पारंपरिकरितीने अश्वांनी रिंगण पूर्ण केले. संपूर्ण परिसरात विठ्ठलनामाचा निनाद आणि टाळ-चिपळ्यांचा नाद गुंजत होता.हा रिंगण सोहळा गेली तेरा वर्षे अंबाबाई मंदिरासमोरील मैदानात आयोजित केला जात असून, यंदाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भक्ती, परंपरा आणि एकतेचा अनुभव देणारा जिल्ह्यातील एकमेव रिंगण सोहळा यंदाही आटपाडीकरांच्या मनात कायमचा घर करून गेला.

सकाळी तडवळे येथून निघालेली पालखी दुपारी आटपाडीच्या साई मंदिरात पोहोचली. सायंकाळी सातभाई विठोबा मंदिराजवळ माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, नगरपंचायत मुख्याधिकारी वैभव हजारे, कल्लेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप पाटील, प्रकाश दौंडे, जालिंदर चव्हाण, शिवाजी माळी, दत्तात्रय पाटील, बाबुराव गुरव आदींसह नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. दिंडीचालक मल्हारी जवाहरे, रथचालक जयराम देशमुख, दादासाहेब शेवाळे, चोपदार कृष्णात सुतार आणि भक्तांनी मिरवणुकीस साथ दिली. रिंगण पूर्ण झाल्यानंतर पालखी श्री कल्लेश्वर मंदिर, तांबडा मारुती मंदिर परिसरात विसावली. भाविकांनी वारकर्‍यांचे स्वागत करत पाहुणचार दिला. रात्रीचा विसावा शहरात घेतल्यानंतर सकाळी पालखी माणगंगा साखर कारखाना मार्गे कौठूळीकडे रवाना झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news