सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली जिल्ह्यातील सीमा भागावर लक्ष केंद्रित करून अमलीपदार्थांची लागवड, विक्री, वाहतूक व साठवणूक होणार नाही, याबाबत जिल्हास्तरीय एनकॉर्ड समितीमधील सर्व विभागांनी दक्ष राहावे. तसेच एम.आय.डी.सी. आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या अख्यत्यारित असणार्या सर्व प्रकारच्या बंद कंपन्या, कारखाने यांची माहिती समितीस सादर करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी गुरुवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या एनकॉर्ड समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, आरोग्य विभागाचे मुजाहिद अलसानकर, डॉ. रवींद्र ताटे, समाजकल्याण विभागाचे एस. डी. भांबुरे आदी उपस्थित होते. डॉ. दयानिधी म्हणाले, अमली पदार्थांची लागवड, विक्री व सहभागासंदर्भात सखोल तपास करून वन विभाग व कृषी विभागाने कायदेशीर कारवाई करावी.