सांगली

Shivajirao Naik : शरद पवारांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अविनाश सुतार

शिराळा, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कधी होणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आज मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईक यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी शिवाजीराव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, नाईक हे २ एप्रिलला शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) हे गेली दोन वर्षे भाजपवर नाराज होते. भाजपने २०१४ पासून त्यांना मंत्रिपदासाठी डावलले. त्याचबरोबर अडचणीत आलेल्या संस्थांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. अडचणीत आलेल्या संस्था पुनर्जिवित करण्यासाठी त्यांची आणि त्यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, सत्यजित नाईक यांची धडपड सुरू होती. शेकडो हातांचा रोजगार संस्था बंद असल्यामुळे थांबला होता. अखेर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक यांची वर्णी लागली आणि यातूनच शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला चालना मिळाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी बेरजेचे राजकारण करत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन आपला राजकीय पाया आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वप्रथम 'दैनिक पुढारी' मधून या पक्ष प्रवेशाबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आजच्या बैठकीचे देखील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. शिवाजीराव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक, सत्यजित नाईक, अभिजित नाईक यांची सविस्तर बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवाजीराव नाईक यांना शरद पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर दोन एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी शिराळा येथे श्री. शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर मोठा मेळावा घेऊन शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले जात आहे.

यापुढे आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी मतदारसंघाबरोबर सगळीकडेच राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन काम करू. त्यानुसार आम्ही यापुढे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न यापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून करत राहू, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली आहे.

शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक मदत होणार आहे. एकमेकांना सहकार्य करत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयंतराव पाटील यांच्या सहकार्याने काम करत राहू, अशी प्रतिक्रिया आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

या मंदिराला आहे 500 वर्षांचा इतिहास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT