भाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य Pudhari Photo
सांगली

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंचा खरा चेहरा उघड

आरक्षणाच्या वक्तव्यावरून मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे आता मराठा समाजाला आरक्षण कशाला, असे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे मराठा समाजातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दौड आयोजित करून मराठा समाजातील व बहुजनांतील तरुणांना शिक्षण, करिअरपासून आतापर्यंत वंचित ठेवले. आता त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. त्यामुळे त्यांच्यामागे आता कोणी फिरणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय पाटील म्हणाले, संभाजी भिडे यांच्यामागे मराठा व बहुजन समाजातील तरुण होते. ऐन परीक्षेच्या काळामध्ये दौड, गडकोट मोहिमा यामध्ये हे तरुण सहभागी होत होते. करिअर व शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असे. त्यातून अनेक तरुणांचे करिअर बरबाद झाले. ही बाब तरुणांच्या लक्षात आली आहे. त्यांच्यामागे फिरणार्‍या तरुणांची संख्या कमी झाली आहे. तरुणांना आता रोजगार, नोकरी हे प्रश्न त्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. इतर समाजाच्या तुलनेत आपण वंचित व मागे राहत आहोत, ही बाब लक्षात आल्यानंतर मराठा तरुण रस्त्यावर उतरून मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहे. या तरुणांची सहानुभूती मिळविण्यासाठी संभाजी भिडे यांनी माझा आरक्षणाला पाठिंबा आहे, असे वक्तव्य केले होते. त्याशिवाय त्यांनी जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा असल्याचे सांगितले होते. मात्र आता ते मराठा समाजाला आरक्षण कशाला, असे वक्तव्य करीत आहेत. पोटात असलेले त्यांचे ओठावर आलेले आहे. त्यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते.

नितीन चव्हाण म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी होत आहे. ही बदनामी संभाजी भिडे यांना सहन होत नाही. त्यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत, हे आता मराठा तरुणांना लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांच्यामागे आता कोणी जाणार नाही. भिडे यांच्या वक्तव्याकडे लक्ष देणे गरजेचे नाही.

संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले, आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी गरजवंत मराठ्यांसाठी जोरदार लढा उभा केला आहे. तो अंतिम टप्प्यात आला असून, तो सोडवण्यासाठी त्यांनी विरोधकांवर, सरकारवर सातत्याने योग्य मार्गाने दबाव टाकून प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून न्याय मिळावा या हेतूने आपल्या जिवाची बाजी लावून उचलून धरला आहे. अशावेळी नेहमीप्रमाणे संभाजी भिडे यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी बेताल वक्तव्य केले आहे. याचा संभाजी ब्रिगेडच्यावतीने मी निषेध व्यक्त करतो. मराठा व बहुजन समाजातील तरुणांना भिडे यांचा खरा चेहरा कळला आहे. त्यामुळे त्यांच्यामागे आता कोण जाणार नाही.

संभाजी ब्रिगेड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रेखा पाटील म्हणाल्या, संभाजी भिडे यांनी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत. यापूर्वी अनेक वेळा त्यांनी महिला भगिनींचा सातत्याने अपमान केला आहे. महिलांना कमी लेखणे, तुच्छतेची वागणूक देणे हे अशा ज्येष्ठ व्यक्तीकडून कधीही अपेक्षित नसते. मराठा आरक्षणासंदर्भात चालू असलेल्या आंदोलनामध्ये आपण ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा सर्व महिलांच्यावतीने आंदोलन करण्यात येईल.

मराठा क्रांती मोर्चाचे राहुल पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सध्या मराठा आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलेले असताना, पॅलिस्टिन मुस्लिम लोकांसाठी काही भारतातील मुस्लिम रस्त्यावर उतरले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून बांगलादेशमधील हिंदूंसाठी इकडचे हिंदू रस्त्यावर उतरत आहेत. आंदोलन कोणी कसे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आंदोलन करून बांगलादेशमधील प्रश्न सुटणार नाहीत. ते केंद्र सरकारने सांगितले की सुटतील. त्यामुळे सांगली बंद पार्श्वभूमीवर मराठा समाजाने तटस्थ राहणे योग्य आहे. हिंदुत्ववादी असेल किंवा बहुजनवादी विचारधारा असेल, दोन्हीमध्ये मराठ्यांचा केवळ राजकीय वापर सर्वपक्षीय नेत्यांकडून करून घेण्यात आलेला आहे.

बंदमध्ये सामान्यच भरडला जाणार

डॉ. पाटील म्हणाले, बांगलादेशात हिंदू लोकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेधच केला पाहिजे. याबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. मात्र आपण बंद ठेवून काय उपयोग होणार आहे. यामध्ये उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने सामान्य भरडला जाणार आहे. त्यामुळे अशा गोष्टीसाठी बंद ठेवणे चुकीचे आहे.

देशातील अत्याचार दिसत नाही का?

डॉ. संजय पाटील म्हणाले, मणिपूर येथे कित्येक दिवस अत्याचार सुरू आहे. कोलकातासारख्या घटना वरचे वर होत आहेत. याबाबत संभाजी भिडे कधी भूमिका जाहीर करीत नाहीत. आता निवडणूक आल्याने वक्तव्य करून लक्ष स्वतःकडे वेधण्याचा त्यांचा केवळ प्रयत्न सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT