सांगली ःराज्यात सर्व ठिकाणी भाजप व शिवसेनेची युती झाली असताना सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेसाठी शिवसेनेला अंडरइस्टिमेट केले, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे. ही निवडणूक ताकदीनिशी लढून भाजपला ताकद दाखवून देऊ, असा इशारा पर्यटनमंत्री तथा संपर्कप्रमुख शंभुराज देसाई यांनी दिला.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेला बरोबर घेण्याचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी भाजपने युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेने मनपाच्या 78 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. सोमवारी शिवसेनेचे नेते शंभुराज देसाई यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकीचे नियोजन केले. या बैठकीला आ. सुहास बाबर, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महानगर क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, सचिन कांबळे हरिदास लेंगरे, सुनीता मोरे आदी उपस्थित होते. बैठकीत ना. देसाई यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
ना. देसाई म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपबरोबर युती करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर चर्चेच्या फेऱ्या झाल्या. जागावाटपात योग्य सन्मान मिळावा, ही आमची मागणी होती. जागावाटपात मागे-पुढे सरकायची देखील तयारी होती. मात्र भाजपने मान-सन्मान ठेवला नाही. अखेरच्या क्षणी युती तुटली. मंगळवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला लढायला शिकवले आहे. त्यामुळे आता थांबायचे नाही. स्वबळावर लढायचे आहे. पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवायची आहे. मी देखील पूर्ण वेळ देणार आहे.
अनेकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
भाजपमधील अनेकांना उमेदवारी मिळालेली नाही. त्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस यांची एकत्रित आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षाकडे नाराज असलेल्यांनी ना. देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.