

सातारा : शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे यांनी 2024 मध्ये केलेल्या उठावामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेतून पायउतार झाली. त्यामुळेच सत्तेबाहेरील भाजपला सत्तेत येता आले, असे विधान राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
ना. देसाई म्हणाले, मंगलप्रभात लोढा यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. 2014 पर्यंत भाजप ताकदवान नव्हती, असे मत लोढा यांनी व्यक्त केले आहे. वास्तविक, लोढा यांनी मधल्या काळात झालेल्या राजकीय स्थित्यंतरांकडेही पहावे. 2019 नंतर महाविकास आघाडी तयार झाली. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सरकार केले. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा ताकदवान झाली होती. मात्र, 2022 ला ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उठाव केला. सत्ता असतानाही आम्ही 50 आमदारांनी सत्तेबाहेर पडून उठाव केला. त्यानंतर सत्तेबाहेरील भाजप पुन्हा सत्तेवर आली. त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी महायुती म्हणून महाराष्ट्रात काम केले.
ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी विचारविनिमय करुनच त्यांनी निर्णय घेतले होते. ना. शिंदे यांच्या वेगवान कार्यपद्धतीमुळे 2024 च्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महाविकास आघाडीकडून नॅरेटिव्ह पसरवला गेला तरी ना. शिंदे यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने विश्वास दाखवला. ना. एकनाथ शिंदे यांनी झोकून देवून काम केले. विधानसभेला शिवसेनेने 80 जागा लढल्या त्यापैकी 61 जिंकल्या. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अनेक लोकोपयोगी प्रभावी योजना राबवल्या, त्यामुळे महायुती मजबूत झाली. ना. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला सत्तेत चांगला वाटा मिळाला. भाजपसोबत असलेली युती ना. शिंदे यांनी पुनर्जिवित केली. महायुतीला यश मिळाले. उठावाची भूमिका आम्ही घेतली म्हणूनच हे शक्य झाले. भाजप नेत्यांनी हेही लक्षात घ्यावे, असे देखील ना. शंभूराज देसाई म्हणाले.