सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत महायुती व्हावी असे आमचे मत होते. त्यादृष्टीने आमची तयारी होती. पण भाजपा हा मित्रपक्ष ऐनवेळी बदलला. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ताकदीने 66 उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेशिवाय कोणाचीही सत्ता स्थापन होणार नाही, असा विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांचा प्रचारप्रारंभ येथील गणपती मंदिरात नारळ फोडून केला. त्यानंतर विश्रामबाग येथील गणपती मंदिराजवळ सभा झाली, या सभेत ते बोलत होते. सभेला आ. सुहास बाबर, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, संजय विभुते, महानगरप्रमुख मोहन वनखंडे, युवा नेते सचिन कांबळे, गौरव नायकवडी, महेंद्र चंडाळे, हरिदास लेंगरे, युवराज शिंदे आदी उपस्थित होते.
ना. देसाई म्हणाले, महायुती व्हावी यासाठी आम्ही आग्रही होतो. भाजपने जागा देण्याचे मान्य केले होते. मात्र त्यानंतर ते बदलले. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण शिवसेनेला घेतल्याशिवाय महापालिकेची सत्ता स्थापन करणे कोणालाही शक्य नाही. महापालिका क्षेत्रासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. नगरविकास खाते त्यांच्याकडे आहे. त्यामुळे शहराला निधी कमी पडणार नाही. भविष्यातील सांगलीचे व्हिजन शिवसेनेने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी आम्ही मास्टर प्लॅन करत आहोत, त्याला आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच ड्रेनेजची रखडलेली योजना मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात बैठक लावू, अशी ग्वाही दिली.
आ. सुहास बाबर म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचा मानसन्मान राखण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. शहरात शेरीनाल्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. अनेकजणांनी सत्ता भोगली, पण हा प्रश्न काही सुटला नाही. पण या योजनेसाठी आम्ही पाठपुरावा करू.