

कराड : दै. ‘पुढारी’ने गेल्या आठ दशकांपासून समाजहित जपत निर्भीड, निपक्ष: पत्रकारितेची परंपरा जपली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून सुरू असल्याचे गौरवाद्गार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काढले.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दै. ‘पुढारी’च्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्त कराड विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दै. ‘पुढारी’चे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासह सियाचीनपर्यंत पोहोचले असून त्याचा प्रत्येकाला अभिमान असल्याचे गौरवोद्गार मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी काढले.
याप्रसंगी कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, प्रकाश जाधव, शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माने, प्रमोद वेर्णेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कराड उत्तर तालुकाध्यक्ष जितेंद्र डुबल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दै. ‘पुढारी’चे ब्युरो मॅनेजर सतीश मोरे यांनी पालकमंत्री देसाई यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी दै. ‘पुढारी’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.