Shaktipeeth Highway file photo
सांगली

Shaktipeeth Highway Protest | शक्तीपीठ महामार्गाविरोधातील मुंबई आंदोलनासाठी भाग्यनगरातून शेकडो शेतकरी कूच करणार

पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील हजारो शेतकरी मुंबईकडे कूच करण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

Sangli Farmers March

विटा : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी खानापूर तालुक्यातील बाधित भाग्यनगर गावातून चार ट्रॅव्हल्समधून शेकडो शेतकरी, महिला व ग्रामस्थ ७ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. दीपक लाड यांनी दिली.

शक्तीपीठ महामार्गाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेविरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील हजारो शेतकरी मुंबईकडे कूच करण्याची तयारी करत आहेत. आंदोलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी भाग्यनगर (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात संघर्ष समितीची बैठक पार पडली.

यावेळी अॅड. दीपक लाड म्हणाले, "शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्याची पहिली ठिणगी भाग्यनगरमध्ये पडली. तेव्हापासून येथील महिला शेतकरी या आंदोलनात सातत्याने आघाडीवर राहिल्या आहेत. मुंबईतील आंदोलनातही भाग्यनगरच्या महिलांची उपस्थिती आणि भूमिका महत्त्वाची ठरणार आहे."

मुंबईतील आंदोलनासाठी भाग्यनगर गावातून चार ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली असून, या माध्यमातून शेकडो शेतकरी आणि महिला शेतकरी मुंबईकडे रवाना होणार आहेत. वाहतुकीची ही सुविधा व्यंकटेश्वर ट्रॅव्हल्सचे प्रमुख महेश कुपाडे यांनी उपलब्ध करून दिली आहे.

पलूस, कडेगाव आणि खानापूर या तिन्ही तालुक्यांतील हजारो शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत दाखल होणार असून, गावागावांत त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना महामार्गामुळे होणारे नुकसान सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न या आंदोलनातून करण्यात येणार आहे. आपली जमीन वाचवण्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शविल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीला संघर्ष समितीचे पदाधिकारी महेश कुपाडे, किरण चव्हाण, दीपक कदम, महादेव जगताप, संताजी जगताप, अनुराज काटकर, नागनाथनगर विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष संभाजी निकम, भीमराव निकम, मनोज निकम, अक्षय सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT