तासगाव : पुढारी वृत्तसेवा
सावळज (ता. तासगाव) परिसरातील शेतकऱ्यांनी अग्रणी नदीतील वाळू उत्खननाच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह आमदार रोहित पाटील यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवत प्रशासन आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नदीतील अत्याधिक वाळू उपसा सुरू असल्याने पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“अग्रणी नदीतील वाळू उत्खनन तातडीने बंद करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “टेंडर रद्द करा” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांचा इशारा आहे की, जर प्रशासनाने या मागणीवर तात्काळ निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात अधिक मोठे आंदोलन उभारले जाईल.
अग्रणी नदी हा परिसरातील शेतीसाठी मुख्य जलस्रोत असल्याने, शेतकऱ्यांनी वाळू उत्खनन बंद करण्याची मागणी करून प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली आहे.