सांगली ः सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेच्या शेवटच्या दिवशीच निवृत्तीवेतनासह सर्व कागदपत्रे देण्याची सज्जता जिल्हा परिषदेने केली आहे. यातील काही सेवानिवृत्तांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते कागदपत्रे देण्यात आली.
जिल्हा परिषदेत शिक्षण, बांधकाम, आरोग्य अशा विविध विभागांतील 216 कर्मचारी येत्या मार्चअखेर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापैकी 34 कर्मचारी डिसेंबरअखेर निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतनासह अन्य कागदपत्रांसाठी जिल्हा परिषदेत हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दोन-दोन वर्षे निवृत्तीवेतनासाठी शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारावे लागतात. तशी परिस्थिती जिल्हा परिषदेत येऊ नये यासाठीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. आगामी सहा महिन्यांत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) आतापासूनच तयार करायला सुरुवात केली आहे.
यादरम्यान, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येते. निवृत्तीवेतनामधील अडचणी व त्रुटी दूर केल्या जातात. शिवाय कर्मचारी सेवेतच असल्याने पेन्शन ऑर्डरचे काम गतीने होते. जिल्हा परिषदेत काही कर्मचाऱ्यांना विभागीय आयुक्तडॉ. पुलकुंडवार यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ऑर्डर देण्यात आली. सेवानिवृत्तीशिवाय अन्य लाभही तत्काळ देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर आयुक्तनितीन माने, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रभारी अपर आयुक्तरवींद्र कणसे, प्रभारी सहायक आयुक्तविजय धनवटे उपस्थित होते.