सांगली

सांगली : बामणोली येथे धारदार शस्त्राने तरुणाचा खून

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : जुन्या वादातून दोन मित्रांच्या गटात झालेल्या भांडणात धारदार शस्त्राने छातीवर, पोटावर वार करून तरुणाचा खून केल्याची घटना मिरज तालुक्यातील बामणोली येथे मंगळवारी दुपारी घडली. राहुल मोहन नाईक (वय 25, रा. मायाक्कानगर, बामणोली, ता. मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नाईक गटाने केलेल्या प्रतिहल्ल्यात धोंडिराम वसंत दुधाळ (30, रा. मायाक्कानगर, बामणोली) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर त्याचा भाऊ सुधाकर वसंत दुधाळ (28) हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलिस ठाण्यात सुरू होते.

राहुल नाईक व हल्लेखोर धोंडिराम आणि सुधाकर दुधाळ यांच्यात पूर्वीपासून मैत्रीचे संबंध होते. गेल्यावर्षापासून त्यांच्यात काही कारणावरून वाद निर्माण झाला होता. दोन्ही गटांत जुन्या वादाचे कारण सतत धुमसत होते. मंगळवारी दुपारी कुपवाड एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये दोन्ही मित्रांचे गट वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. हॉटेलमधून दोन्ही गट बाहेर आल्यावर त्यांच्यात वादावादी सुरू झाली. काही वेळानंतर बामणोली मायाक्कानगरमधील अंगणवाडीसमोरील रस्त्यावर पुन्हा दोन्ही गटांत वाद चिघळला. यातून दोन्ही गटांत धारदार शस्त्राने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राहुल नाईक याच्या छातीवर, पोटावर वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. तसेच नाईक गटाने केलेल्या प्रतिहल्ल्यात धोंडिराम दुधाळ हा गंभीर जखमी झाला, तर त्याचा भाऊ सुधाकर दुधाळ हा किरकोळ जखमी झाला. राहुल याच्या नातेवाईकांनी त्याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी दुधाळ बंधूंना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणातील दोन्ही गटांतील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

SCROLL FOR NEXT