बिबट्यापासून बचावासाठी कुत्र्यांच्या गळ्यात खिळ्यांचा पट्टा 
सांगली

Sangli Leopard attack : बिबट्यापासून बचावासाठी कुत्र्यांच्या गळ्यात खिळ्यांचा पट्टा

शेतकऱ्याची युक्ती ः हल्ल्यापासून होणार संरक्षण

पुढारी वृत्तसेवा

शिराळा शहर : शेतकऱ्याच्या घरी कुत्रा म्हटले की घरदार, शेती, पाळीव प्राणी यांचा रक्षणकर्ता, अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. जीवावर उदार होऊन तो रक्षणकर्त्यांची भूमिका बजावत असतो. पण हल्ली बिबट्यांचा हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने बिबट्यांपासून कुत्र्यांचच रक्षण करण्याची वेळ मालकांवर आली आहे. त्यासाठी इंग्रुळ येथील (ता. शिराळा) एका शेतकऱ्याने कुत्र्याच्या गळ्यात चक्क खिळ्यांचा पट्टा बांधला आहे.

हा परिसर झाडी आणि डोंगरदऱ्यांनी व्यापला आहे. परिसरात छोट्या-मोठ्या वस्त्या आहेत. पशुपालन व शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. दिवसभर जनावरे जंगलात चरण्यासाठी जात असतात. त्यांच्यासोबत गुराखी असतात. पण हल्ली वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता, पाळीव प्राण्यांवर बिबट्या, तरस, लांडगे, कोल्हे या प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शेतकरी प्राण्यांच्या संरक्षणासाठी एक कुत्रा नेहमी सोबत ठेवतात.

वन्यप्राण्यांना जंगलात पुरेसे खाद्य उपलब्ध नसल्याने हे प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या प्राण्यांना घाबरवण्यासाठीही कुत्र्याची मदत होते. बिबट्या मानेला पकडून प्राण्यांना ठार करत असतो, हीच बाब लक्षात घेऊन इंग्रुळ येथील शेतकरी सर्जेराव पोखलेकर यांनी कुत्र्याच्या मानेभोवती अनुकूचीदार खिळे असलेला पट्टा बसवलेला आहे. कधी कुत्र्यावर हल्ला झालाच, तर मानेचे संरक्षण हा टोकदार खिळ्यांचा पट्टा करणार आहे.

कुत्र्याचे लहान पिल्लू ते मोठे कुत्रे होण्यापर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते. हा कुत्रा घरातील एका सदस्याप्रमाणे असतो. अचानक त्याच्यावर हल्ला होऊन आपल्यातून जाण्याने मनाला वेदना होतात. या जीवाभावाच्या संवगड्याचे रक्षण करण्यासाठी ही युक्ती केली आहे. परिसरात बिबट्याची दहशतही वाढली आहे त्यामुळे ही युक्ती केली आहे.
- सर्जेराव पोखलेकर शेतकरी, इंग्रुळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT