सांगली

सांगली : मुलगा होत नसल्याने पतीने मित्राच्या साथीने केला गर्भवती पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

backup backup

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन पत्नीचा मित्राच्या सहकार्याने दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. काळेवाडी (ता.आटपाडी) गावाच्या हद्दीतील चिंचघाट डोंगरामध्ये हा प्रकार घडला. चिंचघाट येथे मॉर्निंग वॉक करीता आलेल्या सोमनाथ मच्छिंद्र इंगळे (रा.ताडाचीवाडी) यांनी जखमी अवस्थेतील महिलेबाबत पोलीस मदत केंद्राला माहिती दिली. त्यानंतर पोलीस तपासात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी प्रद्युमनकुमार पिताबास जेना (रा.पाटीलवाडी) आणि संपतराव एकनाथ गायकवाड (रा.पात्रेवाडी) या दोन आरोपींना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रद्युमनकुमार जेना यांना दोन मुली आहेत. त्यांची पत्नी प्रेमलता तिसऱ्यांदा गर्भवती होती. मुलगा होत नसल्याने प्रद्युमनकुमार जेनाने त्याच्या संपतराव गायकवाड या मित्राच्या सहकार्याने पत्नीला मुल चेक करण्याचा बहाणा करत गाडीत बसवले. मुंबईतून ते थेट आटपाडी तालुक्यातील काळेवाडी गावाच्या हद्दीतील चिंचघाट या डोंगराळ भागात आले. त्यानंतर त्यांनी प्रेमलता जेना हीचा दोरीने गळा आवळला आणि ती बेशुध्द पडल्यावर मेली असे समजून निघून गेले.

दरम्यान, या घटनेनंतर या परिसरात सकाळी फिरायला आलेल्या सोमनाथ इंगळे यांना जखमी अवस्थेतील महिला बघून पोलीस मदत केंद्राला फोन केला. पोलीसांनी तत्काळ जखमी महिलेला सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे उपचाराकरीता दाखल केले. ही महीला शुद्धीवर आल्यानंतर तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी,अजित पाटील आणि राकेश पाटील, संभाजी सोनवणे, सायबर शाखेचे कर्मचारी यांनी तपास केला.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT