Khanapur Land Survey Protest Pudhari
सांगली

Shaktipeeth Highway Protest | शक्तिपीठ महामार्गाविरोधात खानापुरात तणाव; मोजणीसाठी आलेल्या वाहनाला आंदोलकांनी अडवले

माहुलीत शेतकऱ्यांचा ठिय्या, राजू शेट्टी आंदोलनस्थळी, आंदोलकांचा संजय राऊतांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

Khanapur Land Survey Protest

विटा : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात खानापूर तालुक्यातील भाग्यनगर येथे शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले. या महामार्गामुळे गावाचे अस्तित्व धोक्यात येणार असून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी खासदार संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत गावाची व्यथा मांडली. यावेळी राऊत यांनी स्वतः भाग्यनगरला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, जयराम जगताप, दिलीप जगताप, नामदेव काटकर, भारत निकम, उद्धव सकटे, मीनाताई जगताप, आशाताई जगताप, रूपाली जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितीत महामार्गाविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

दरम्यान, माहुली येथे शक्तिपीठ महामार्गाच्या प्रारंभबिंदूवर मोजणीच्या हालचाली सुरू होताच आंदोलनाला अधिक तीव्र वळण मिळाले. दुपारी पावणेतीनच्या सुमारास मोजणीची यंत्रे घेऊन एक वाहन आंदोलनस्थळी दाखल झाले. हे पाहताच काही आंदोलक वाहनाच्या आडवे झाले, तर काहींनी वाहनासमोरच ठिय्या मांडला. 'इंच इंच जमिनीसाठी रक्ताचे पाट वाहतील', 'शेतकरी एकजुटीचा विजय असो', तसेच 'या फडणवीस सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

खानापूर तालुक्यातील शक्तिपीठ महामार्गाचा प्रारंभबिंदू असलेल्या माहुली येथे पहाटेपासूनच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी मोठ्या बंदोबस्तात तैनात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हेही रात्रीपासून तालुक्यात ठाण मांडून आहेत. सकाळपासून ते माहुली येथे आंदोलनस्थळी उपस्थित असून, एका दुचाकीवर बसून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी दीपक लाड यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली.

तर दुसरीकडे, कोणत्याही परिस्थितीत आज मोजणी पूर्ण करण्याच्या निर्धाराने महसूल आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, आंदोलक माघार घेण्याच्या प्रतीक्षेत अधिकारी आहेत. तर प्रशासनाचे अधिकारी माघारी जाण्याची आंदोलक वाट पाहत आहेत. त्यामुळे माहुली येथे प्रशासन आणि आंदोलक यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

परिस्थिती लक्षात घेता एसआरपीच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. खासगी वेशातील पोलीसही परिसरात तैनात आहेत. एक-दोन ठिकाणची मोजणी थांबवण्यात आली असली, तरी माहुली येथील मुख्य मोजणी पूर्ण करण्यावर प्रशासन ठाम असल्याने संघर्षाची शक्यता कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT