Tembhu Scheme Canal Sulewadi Incident
विटा : दारूच्या नशेत आपला दम दाखवायच्या नादात १०० फुट खोल टेंभू च्या कॅनॉलमध्ये उडी मारली आणि पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. श्रीकांत विलास पवार (वय ३०, रा. सुळेवाडी, ता. खानापूर) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.१४) मध्यरात्री घडली असून आज सकाळी उघडकीस आली. याबाबत शरद तुकाराम पवार यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, सुळेवाडी जवळच टेंभू योजनेच्या खानापूर - तासगाव कॅनॉल आहे. तेथील श्रीकांत पवार याचा काल वाढदिवस होता. या निमित्ताने काल त्याने मित्रांबरोबर कॅनॉलवरच पार्टी केली. त्यावेळी त्याने खूप दारू प्यायली. त्यानंतर त्या नशेतच मित्रांसोबत पाण्यात उतरण्याची पैज लावली. त्यातच त्याने आपला दम दाखवतो, असे म्हणत चक्क १०० फूटपेक्षा खोल असलेल्या टेंभू योजनेच्या पाण्याने भरलेल्या कॅनॉलमध्ये उडी मारली.
मात्र, रात्रीची वेळ शिवाय दारूचा अंमल यामुळे त्याला नीट पोहता आले नसावे आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.