विटा, पुढारी वृत्तसेवा : नोकरी आणि शिक्षणाचे खासगीकरण करण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळाचेच खासगीकरण करा. म्हणजे पुन्हा कशाचेही खासगीकरण करण्याचा प्रश्नच उरणार नाही, अशी खरमरीत टीका स्व.क्रांतिसिंह नाना पाटलांचे नातू आणि जिल्हा शेकापचे सरचिटणीस कॉम्रेड ॲड. सुभाष पाटील यांनी केली. राज्य सरकारने गेल्या आठवड्यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. यांत शासकिय नोकरीत खासगी नोकरभरती आणि शिक्षण विभागात खासगीकरणा संदर्भात मोठे निर्णयांचा समावेश आहे. मात्र यामुळे जन्माचा संताप जनमानसा तून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत कॉम्रेड ॲड. सुभाष पाटील यांनीही टीकास्त्र सोडले आहे.
सुभाष पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शासकिय शाळा संबंधी आता या सर्व शाळा कार्पोरेटर्सना चालवायला देण्याचे नियोजन आहे. सरकारी सर्व शाळा, त्याच्या जागा, बांधलेल्या इमारती , त्यातील साहित्यासह सरकार भांडवलदारांना चालवायला देऊन आपली जबाबदारी झटकून टाकणार आहे. याचे किती गंभीर परिणाम शैक्षणिक क्षेत्रात होतील ? याचा विचार ना सरकार करतय ना समाज. जे भांडवलदार या शाळा चालवायला घेणार, त्या शाळामधील प्रवेश , शाळांची फी सामान्य माणसाला झेपेल का ? ज्या शाळेत अपेक्षित विद्यार्थी पट संख्या नसेल तर त्या शाळा हे भांडवलदार सुरु ठेवणार का ? शिवाय दऱ्या खोऱ्यात , वाड्या वस्त्यावरील शाळांचे काय करायचे ? तिथल्या मुलांनी शिकायचे की नाही ? असे झाले तर राज्य घटनेने दिलेल्या शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराचे काय ? उठता बसता शाहु , फुले, आंबेडकरांचे नाव घेणारे राज्यकर्ते गोरगरीब, दलित मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे करुन टाकयला निघाले आहेत.