सांगली : उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ स्वतःच्या जागेवर व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेलबरोबरच सीएनजी (किरकोळ विक्री) पंप सुरू करणार आहे. आर्थिक तूट कमी करण्यासाठी नवे पर्याय निर्माण करण्यात येत आहेत. यासाठी लवकरच शासनाला जागा सुचवण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील एसटीला रोज 60 हजार लिटर डिझेल लागते. हे डिझेल खासगीरित्या खरेदी करण्यात येते. एसटीचे कमिशनसाठी द्यावे लागणारे पैसे वाचवण्यास स्वतःच्या पेट्रोल पंपामुळे मदत होणार आहे.एसटी महामंडळाची नेहमी आर्थिक कसरत सुरू असते. अशा परिस्थितीत केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणे अवघड झाले आहे. एसटीच्या अनेक फेऱ्या नुकसानीत आहेत. विशेषत: शहरी बस वाहतूक तोट्यात आहे. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. गेल्या 70 वर्षांपेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे. त्यामुळे एसटीने स्वतःच्या जागेवर पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल पंप उभारण्यासाठी काय करता येईल, अशी विचारणा शासनाकडून एसटी प्रशासनला करण्यात आली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने याचा अभ्यास सुरू केला आहे. सध्या यासाठी जिल्ह्यात जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सध्या पेट्रोल पंप चालवणे आणि त्याची देखभाल करण्याचा अनुभव एसटी महामंडळाच्या पाठीशी आहे. प्रत्येक डेपोत पंप सुरू आहेत. त्यासाठी कर्मचारी वर्गही आहे. आता हा पंप सर्वसामान्य ग्राहकांसाठी उभारण्यात येणार आहे. सीएनजी या पारंपरिक इंधन विक्रीबरोबरच इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले पंप उभे करणे प्रस्तावित आहे. इंधन विक्री पंप हे रस्त्यालगत व व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या स्वत:च्या ज्या जागा आहेत, त्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.