

ईश्वरपूर : पुसेसावळी ते वाकुर्डे बुद्रुक रस्त्यावर फार्णेवाडी ते बोरगावदरम्यान रस्त्यात टाकलेल्या दगडाच्या ढिगाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात हुतात्मा कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव ऊर्फ जयकर यशवंतराव चव्हाण (वय 56, रा. नवेखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री घडला.
पुसेसावळी ते वाकुर्डे बुद्रुक यादरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. बहे हायस्कूल ते फार्णेवाडीदरम्यान 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. फार्णेवाडीनजीक जमदाडे यांच्या वस्तीनजीक दगडी पिचिंगसाठी मोठे दगड रस्त्यात टाकले आहेत. दगडाने काँक्रिटचा रस्ता निम्मा व्यापला आहे. शुक्रवारी रात्री जयकर चव्हाण हे दुचाकीवरून (क्र. एमएच 10 ए 1800) बहे हायस्कूलकडून नवेखेडच्या दिशेने निघाले होते. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास फार्णेवाडीनजीक रस्त्यातील दगडाच्या ढिगाला त्यांची दुचाकी धडकली. त्यांचे डोके रस्त्यावर आपटले.
मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जयकर चव्हाण हे नवेखेड सर्वसेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष तसेच हुतात्मा सहकारी साखर कारखाना व हुतात्मा सहकारी दूध संघाचे माजी संचालक होते. अपघाताची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सुरू आहे.