विटा , पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे बिबट्या आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याची पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून खानापूर तालुक्या तील आळसंद परिसरात बिबट्या असल्याच्या चर्चेने सर्वत्र खळबळ माजली होती. आज मंगळवारी (दि.२१) सकाळी गावाच्या पश्चिमेकडील भागात कमळापूर रस्त्यावर बिबट्याचे असल्याचे लोकांनी अगदी वर्णनासह एकमेकांना सांगितले. मात्र ही बाब दिवसभरात चर्चेच्या रूपातच राहिली होती.
काही लोकांनी सायंकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता वन विभागाच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी वन विभागाच्या पथकाला बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना सतर्क केले. काही वेळेनंतर वन विभागाच्या पथकाला देखील बिबट्याचे दर्शन झाले. रात्रीची वेळ असल्यामुळे बिबट्याला पकडण्या त अनेक अडचणी होत्या. ग्रामस्थांनी सतर्क रहावे असे आवाहन वन अधिकारी अरविंद कांबळे यांनी केले आहे.