विटा: पुढारी वृत्तसेवा : येथील श्री सुळकाई नवरात्र महोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे या महोत्सवात विटा शहरातील भाविकांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री रेवणसिद्ध परिसर विकास ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केले आहे.
याबाबत ॲड. बाबासाहेब मुळीक म्हणाले की, रेणावी येथे श्री. रेवणसिद्ध परिसर विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही १९९९ साली श्री. सुळकाई नवरात्र महोत्सव सुरु केला. विटा पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक रामचंद्र घुगे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ज्योत घेऊन चालत येथील शिव मल्हार डोंगर रांगांवरील श्री सुळकाई मंदिरात जाऊन घटस्थापना केली होती. त्यानंतर नवरात्र ते विजयादशमी या कालावधीत देवीच्या मंदिरातील दीपमाळ प्रज्वलित करून आरती करण्याचा नित्यक्रम म्हणजेच श्री. सुळकाई नवरात्र महोत्सव.
आज या महोत्सवाचे पंचविसावे वर्ष आहे. १९९९ साली सुळकाई मंदिर परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा. विटा शहरापासून अगदी जवळ असलेल्या शिव मल्हार डोंगरावरील या तीर्थक्षेत्राकडे तरुणाई आणि भाविक आकर्षित व्हावेत, या उद्देशाने हा महोत्सव सुरु केला. १९९० च्या दशकात श्री रेवणसिद्ध परिसर विकास मंडळ, रेणावीची स्थापना करून श्री. रेवणसिद्ध परिसरातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मागील पंचवीस वर्षे नवरात्रीत श्री. रेवणसिद्ध परिसर विकास मंडळ व श्रेयस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी नवीन भगवा ध्वज उभा करून देवीची दीपमाळ प्रज्वलित करून सायंआरती केली जाते. श्री. सुळकाई मंदिराचा स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिर परिसराकडे जाण्यासाठी रेवणसिद्ध घाटातून मूळस्थानमार्गे पक्का रस्ता झालेला आहे. परिसरात नवीन वृक्षलागवड केली आहे. त्यामुळे येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
हेही वाचा