Polling Stations Shirala
शिराळा: शिराळा तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आज (दि.६) सकाळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा येथून निवडणूक साहित्याचे वाटप करून केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी यांना एसटी बस व इतर वाहनांद्वारे संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले.
शिराळा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी एकूण १७१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तालुक्यातील एकूण मतदारसंख्या १ लाख ३९ हजार १३९ असून, त्यामध्ये ७० हजार ६५४ पुरुष मतदार, ६८ हजार ४८३ महिला मतदार व २ इतर मतदारांचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी १७१ केंद्राध्यक्ष, ५१३ मतदान अधिकारी, १७१ शिपाई, १२७ पोलीस कर्मचारी व १६६ होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच १९ झोनल अधिकारी असून त्यापैकी ३ राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदानासाठी १७१ ईव्हीएम यंत्रे वापरण्यात येणार असून ४८ यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. मंगले येथील मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र तर बिऊर येथील केंद्र महिला मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी २३ एसटी बस व १४ खासगी जीप उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस उपअधीक्षक, एक पोलीस निरीक्षक, ९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १७० पोलीस हवालदार, १७५ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच ९ मोठी व २ लहान वाहने, २ रॅपिड अॅक्शन फोर्स पथके व ८ विशेष पोलीस पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
मतदान शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा येथे सोमवार, १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून ती गटनिहाय केली जाणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबलवर १४ फेऱ्यांमध्ये प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच टपाली मतमोजणीसाठी ४ स्वतंत्र टेबल ठेवण्यात आली आहेत, ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे व सहाय्यक निवडणूक अधिकारी शामला खोत- पाटील यांनी दिली.