विटा: जाहीर सभेत बोलताना माजी खा. राजू शेट्टी, सोबत ॲड. सुभाष पाटील, ॲड. दीपक लाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, निखिल सुतार आदी Pudhari
सांगली

Raju Shetti | जनरल डायरच्या औलादी शेतकऱ्यांच्या मुळावर; मुख्यमंत्र्यांनी सांगलीचा इतिहास लक्षात ठेवावा : राजू शेट्टी

शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

Shaktipeeth Highway Protest Vita Sangli

विटा : शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होत असून, शासनाच्या सर्वेक्षण पद्धतीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे. "जनरल डायरच्या औलादी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. सांगली हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी आणि क्रांतिअग्रणी जी. डी. लाड यांच्या संघर्षाची परंपरा या मातीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा इतिहास लक्षात ठेवावा," असा इशारा शेट्टी यांनी दिला.

शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी प्रमुख उपस्थित होते. मोर्चानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

यावेळी शेट्टी यांनी प्रशासनाला लक्ष्य करत, पहाटेच्या वेळी सर्वेक्षण का केले जात आहे, असा सवाल प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांना केला. त्यानंतर प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि तहसीलदार योगेश टोंपे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

नागेवाडी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध झाल्यानंतर प्रशासनाने भाग्यनगर आणि चिखलहोळ परिसरात कडक पोलीस बंदोबस्तात पुन्हा मोजणी सुरू केली होती. मात्र स्थानिक महिलांनी आक्रमक भूमिका घेत पेट्रोल ओतून आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत मोजणीचे काम थांबविण्यात आले.

त्यानंतर प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले. याबाबत माहिती मिळताच शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांना विट्यात येण्याची विनंती केली. त्यानुसार शेट्टी विट्यात दाखल झाले. दरम्यान, संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मुख्य चौकातून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी, महिला आणि युवक सहभागी झाले होते.

सभेत बोलताना शेट्टी म्हणाले, "भाग्यनगर येथे पहाटे तीन वाजता मुसळधार पावसात, संपूर्ण गाव झोपेत असताना पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकासह अधिकारी मोजणीसाठी पोहोचले होते. मात्र गावातील महिलांच्या जागरूकतेमुळे आणि धाडसामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. यावेळी पोलिसांनी महिलांशी धक्काबुक्की केल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे."

शेट्टी यांनी पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप करत सांगितले की, "गावात चोरीच्या घटना घडल्या तरी पोलीस दिसत नाहीत; मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी शेकडो पोलीस रात्रीच्या अंधारात हजर होतात. हे पोलीस महाराष्ट्र सरकारचे नोकर आहेत की खासगी कंपनीचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे."

सांगली जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. "सांगली आणि मिरज शहर अमली पदार्थांच्या विक्रीचे केंद्र बनत आहेत. या विरोधात प्रभावी कारवाई होत नसल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत," असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यास विरोध असल्यास जबरदस्तीने भूसंपादन करू नये, तसेच बाधित शेतकऱ्यांना पीककर्ज अथवा इतर कर्जे नाकारू नयेत, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात शेकापचे कॉ. ॲड. सुभाष पाटील, ॲड. दीपक लाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, निखिल सुतार यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT